सनातन धर्माची रक्षा करणारेच देशाचे महान संत
संत या शब्दाचा अर्थ सनातन आहे. संत नाही तर सनातन धर्म सुद्धा नाही. जो सनातन धर्माची रक्षा करतो तेच महान संत आहेत. संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी संपूर्ण विश्वातील मानवाच्या उद्धारासाठी कार्य केले आहे.” असे विचार बिहारचे माजी कायदा व पर्यटन मंत्री प्रमोद कुमार यांनी व्यक्त केले.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने १८ ते २२ नोव्हेंबर या दरम्यान तत्त्वज्ञ संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७२६ व्या संजीवन समाधी सोहळ्या निमित्ताने लोकप्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
या सोहळ्याला माणा गावाचे कुंदनसिंह रावत हे विशेष सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड होते.
या प्रसंगी कीर्तनकार व प्रवचनकार हभप श्री. डॉ. सुदाम महाराज पानेगांवकर, हभप आपेगांवकर , हभप श्री. तुळशीराम दा. कराड, सौ. उषा विश्वनाथ कराड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन. पठाण व डॉ. मिलिंद पात्रे हे उपस्थित होते.
यावेळी लक्ष्मण सूर्यभान यांचे सुवर्ण पिंपळ या११ व्या आवृत्तीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रमोद कुमार म्हणाले,“हजारो वर्षापूर्वी या देशावर मुघलांनी हल्ले केले परंतू यातून सुद्धा हिंदूधर्माची संस्कृती टिकून आहे. याचे मुख्य कारण म्हणजे वारकर्यांची आस्था आहे. आळंदी येथील वैष्णव मेळाव्याचे कोणत्याही वारकर्यांना आमंत्रण दिले जात नाही, तरीही लाखो वारकरी या सोहळ्याला आवर्जून येतात. देशाची अतूट संस्कृती, महाराष्ट्राची प्रगती आणि भारत मातेला वैभव प्राप्त करून देण्यासाठी डॉ. विश्वनाथ कराड यांच्या हातून अद्वितीय कार्य होत आहेत.”
कुंदनसिंह रावत म्हणाले,“संत मंडळी ज्ञानाच्या माध्यमातून आपल्या विचारांना शुद्ध करण्याचे कार्य करीत असतात. ते सर्वांचे अंतःकरण शुद्ध व निर्मळ बनवितात. आधुनिक युगात याच संतांचे कार्य डॉ. विश्वनाथ कराड यांच्या दूरदृष्टीने होत आहे. त्यांनी माणा गावात माता सरस्वतीच्या मंदिराची निर्मिती करून ज्ञानाची गंगा येथे आणली. त्यांचे कार्य हजारो वर्षापर्यंत जीवंत राहील.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“इंद्रायणी नदीच्या तीरावर जे सजविण्याचे कार्य घडले आहे तो माऊलीचाच कृपाशिर्वाद आहे. वैष्णव धर्माची ओळख आता महाराष्ट्रापूरतीच न राहता सर्वजगात पोहोचली आहे. सद्गुणांची पूजा हीच ईश्वर पूजा आहे. हा केवळ शब्दांचा खेळ नाही तर ते अंतःकरणातून यावे लागते. आज ज्ञानभूमी ते देवभूमी माणा गाव असा प्रवास झाला आहे. माऊलीच्या आशीर्वादाने श्रीक्षेत्र आळंदी-देहू जगाच्या नकाशावर आले आहे. त्या माध्यमातून वारकरी संप्रदाय जगात पोहोचला आहे.”
प्रवचनकार हभप डॉ. सुदाम महाराज पानेगांवकर म्हणाले, संत हा शब्द संस्कृत मधला आहे. ज्यांनी सहा विकारांचा अंत करून स्वतःबरोबरच इतरांचेही आचार, विचार शुध्द केले तेच खरे संत. संत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य विश्वकल्याणासाठी वेचले म्हणूनच ती सर्वांची माऊली आहे. वर्तमान काळात समाजात महिलांवरील अन्याय थांबवायचे असतील तर सर्वांमध्ये माऊली दिसावी या तत्वाचे पालन सर्वांनी करावे. संत हे माय, बाप व गुरू असतात.
संध्याकाळच्या सत्रात ह.भ.प. श्री. किसनमहाराज साखरे यांचे कीर्तन झाले.
रात्रीच्या सत्रात कलाश्री पुणेच्या पंडित सुधाकर चव्हाण व सौ. शाश्वती चव्हाण यांचा भक्तीसंगीताचा कार्यक्रम झाला.
त्यानंतर इंद्रायणी मातेची आरती झाली.
ह.भ.प.शालीकराम खंदारे यांनी सूत्रसंचालन व ह.भ.प.महेश महाराज नलावडे यांनी आभार मानले.