सगेसोयऱ्यांचा गोतावळ्यामुळे शिवाजी मानकरांना ताकद, पुणे लोकसभेसाठी करणार दावेदारी प्रबळ
लोकसभा निवडणुकीचे जोरदार वारे सध्या देशभरात वाहत आहेत. पुणे लोकसभेसाठी देखील इच्छुकांची जोरदार मोर्चेबांधणी सुरु असल्याने वाढत्या उन्हासोबत शहरातील राजकीय वातावरण देखील तापताना दिसत आहे. भाजपकडून सुरुवातीला माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी खासदार संजय काकडे, माजी सचिव सुनील देवधर यांची नावे चर्चेत होती. यामध्ये आता शहरातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठे वलय असणारे शिवाजी माधवराव मानकर यांनी उघडपणे आपणही उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे सांगत मोठा ट्वीस्ट निर्माण केला आहे. सत्ताधारी भाजपने मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर पाठवून पक्षातील उमेदवारीची गणिते सोपी केल्याचे बोलले जात आहे. मात्र, आता लोकसभेसाठी इच्छुकांमध्ये नक्की कोण बाजी मारणार याबाबत चर्चा आणि अंदाज बांधला जात आहे. राज्यसभेला मेधा कुलकर्णी यांच्या रूपाने ब्राम्हण समाजाला प्रतिनिधित्व दिल्याने सुनील देवधर यांच्या दावेदारीला लगाम लागलीय. तर मोहोळ, मुळीक, काकडे आणि शिवाजी मानकर असे मराठा चेहरे आता प्रमुख रेसमध्ये आहेत. मानकर यांच्या रूपाने लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहाही विधानसभा क्षेत्रात गणगोताचे मोठे जाळे असणारा प्रमुख दावेदार भाजपमध्ये पुढे आला आहे. मानकरांची खरी ताकद, त्यांचे सहाही विधानसभा मतदार संघात असलेले गणगोताचे जाळेशिवाजी मानकर हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांचे बंधू आहेत. तर मुळचे नारायण पेठेतील असल्याने शहराच्या मध्यवस्ती भागात त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. बालेवाडीतील बालवडकर, कोथरूड मधील बांदल-सुतार, कसबा मध्ये मानकर, पर्वतीमध्ये कदम, वडगाव शेरीमध्ये गलांडे, पठारे, विश्रांतीवाडीमध्ये टिंगरे, शिवाजीनगरमध्ये बहिरट, निम्हन या सर्व राजकारणात त्या-त्या भागात प्रभाव असलेल्या घराण्यांशी जवळचे नातेसंबंध हा शिवाजी मानकर यांच्यासाठी सर्वात मोठा ‘प्लस पॉइंट’ आहे. तसेच त्यांचा स्वतःचा मोठा मित्र परिवार आहे. मानकर यांना भाजपने उमेदवारी दिल्यास त्यांचे मित्र आणि त्यांचा सहा मतदार संघातील गोतावळा त्यांच्या पाठीमागे सक्षमपणे उभा राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे इतर इच्छुकांच्या तुलनेत त्यांची दावेदारी प्रबळ मानली जात आहे.