संत सोपानदेव देवस्थान व कुष्ठरोगी बांधवांना आत्मनिर्भर करण्याकरिता दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे १० लाख रूपयांची मदत
सासवड येथील श्री संत सोपानदेव देवस्थानला चांदीची पालखी साकारण्याकरिता आणि डॉ.जाल मेहता मेमोरिअल अपंगोधार औद्योगिक सह. संस्था येथील कुष्ठरोगी बांधवांसाठी मदत म्हणून श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे १० लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.
यावेळी डोळ्यांच्या तपासणीकरिता भारतीय स्टेट बँक प्रशासनिक कार्यालय पुणे यांच्यातर्फे देण्यात आलेल्या आधुनिक उपकरणांनी युक्त असलेल्या ट्रस्टच्या रुग्णवाहिकेचे उद्घाटन देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संत सोपानदेव देवस्थानाचे त्रिगुण महाराज गोसावी, संजीवनी हॉस्पिटल रेणुका नेत्रालयाच्या डॉ. चित्रा सांबरे, डॉ.वैशाली ओक, तेजोमयी आय केअर सेंटर आणि सत्यसाई नेत्रालयाच्या डॉ.फाल्गुनी जपे, ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, हेमंत रासने यांसह पदाधिकारी उपस्थित होते.
श्री संत सोपानदेव देवस्थानने चांदीची पालखी साकारण्याचा संकल्प केला होता, त्याकरिता ट्रस्टने ५ लाख रुपयांची मदत दिली आहे. तर, कुष्ठरोगी बांधांवाकरिता आत्मनिर्भर करण्याकरिता संस्थेने मशीन खरेदी करून कुष्ठरुग्णांना स्वत;च्या पायावर उभे राहण्याकरिता ट्रस्टने ५ लाख रुपयांची मदत दिली आहे. येवलेवाडीमध्ये ४०० कुटुंब या कामाच्या माध्यमातून आत्मनिर्भर होत आहेत.
त्रिगुण महाराज गोसावी म्हणाले, ट्रस्टतर्फे आरोग्यसेवेच्या माध्यमातून अत्यंत स्तुत्य कार्य सुरु आहे. ससून रुग्णालयामध्ये रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना भोजनाचा उपक्रम, पालखी मार्गांवर फिरत्या रुग्णवाहिका व पाण्याचे टँकर असे उत्तम आरोग्यविषयक उपक्रम सुरु आहेत. आता डोळ्यांच्या तपासणीसाठी विशेष रुग्णवाहिका सुविधा केल्याने कष्टकरी वर्गाचे आरोग्यविषयक प्रश्न सुटणार आहेत.
माणिक चव्हाण म्हणाले, पुण्यातील झोपडपट्टीतील कष्टकरी व गरजू वर्गाकरिता डोळ्याची तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. झोपडपट्टीमध्ये घरोघरी जाऊन ही तपासणी तज्ञ् डॉक्टर करणार आहेत. तपासणी दरम्यान ज्यांना शस्त्रक्रियेची गरज असेल, त्यांची ट्रस्टच्या माध्यमातून विनामूल्य शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
- फोटो ओळ : सासवड येथील श्री संत सोपानदेव देवस्थान आणि डॉ.जाल मेहता मेमोरिअल अपंगोधार औद्योगिक सह. संस्था या कुष्ठरोगी बांधवांसाठी मदत म्हणून श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे १० लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी डोळ्यांच्या तपासणीकरिता भारतीय स्टेट बँक प्रशासनिक कार्यालय पुणे यांच्यातर्फे देण्यात आलेल्या आधुनिक उपकरणांनी युक्त असलेल्या ट्रस्टच्या रुग्णवाहिकेचे उद्घाटन देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
