श्रीमंत नारो अप्पाजी तुळशीबागवाले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
श्रीमंत नारो अप्पाजी तुळशीबागवाले यांनी इ.स.१७६२ मध्ये तुळशीबागेत श्रीराम मंदिराची स्थापना केली. पानिपतच्या भीषण युद्धानंतर लगेचच नारो अप्पाजी यांनी फेब्रुवारी-मार्च महिन्यात राम मंदिराच्या पायाचा मुहूर्त केला. त्यानंतर सन १७६५ मध्ये राम, लक्ष्मण व सीता यांच्या मूर्ती घडविण्यात आल्या.अशा पेशवाईतील प्रसिद्ध व कर्तबगार व्यक्तिमत्वाच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने तुळशीबाग राम मंदिरात श्रीमंत नारो अप्पाजी तुळशीबागवाले (खिरे) यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन व विशेष कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त श्रीपाद तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, भरत तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले, शिशिर तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता. कीर्तनकार ह.भ.प.वासुदेवबुवा बुरसे यांनी कीर्तनातून नारो आप्पाजी यांचे कार्यकर्तृत्व सांगितले.तुळशीबाग राममंदिर श्रीमंत नारो अप्पाजी तुळशीबागवाले यांनी बांधले. जमा, खर्च व महसूल या विषयांत त्यांनी मोठे काम केले. सन १७५० साली बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांनी नारो अप्पाजी यांना पुणे प्रांताचे सरसुभेदार केले. पेशव्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे व घरगुती संबंध होते.ह.भ.प. वासुदेवबुवा बुरसे म्हणाले, पेशवाईतील आर्थिक बाजू सावरणारे संकट मोचक म्हणून नारो अप्पाजी यांनी कार्य केले. सरदार खासगीवाल्यांकडे चाकरी करताना ज्या बागेत तुळशी वेल खुडले, तीच बाग विकत घेऊन भव्य श्रीराम मंदिर उभे करण्यासाठी नारो अप्पाजी अथक प्रयत्नशील राहिले. त्यामुळे पुण्याच्या विकासाच्या श्रेयनामावलीमध्ये श्रीमंत नारो अप्पाजी तुळशीबागवाले यांचे नाव अग्रभागी आहे, असेही त्यांनी सांगितले. श्रीरंग चासकर यांनी तबला साहिल पुंडलिक यांनी कीर्तनाला पेटीची साथसंगत केली.