शिवनेरीवर तिथीनुसार (दि.१०) शिवनेरी स्मारक समितीतर्फे होणार शिवजयंती उत्सवराजमाता जिजाऊ पुरस्कार प्रदान सोहळा
श्री शिवनेरी स्मारक समिती पुणे तर्फे किल्ले शिवनेरी येथे फाल्गुन वद्य तृतीया म्हणजेच शिवतृतीयेला शुक्रवार, दिनांक १० मार्च रोजी सकाळी ७ वाजता शिवजयंती उत्सव सुरु होणार आहे. शिवाई मातेस अभिषेक, शिवजन्मोत्सव, पालखी सोहळा, शाहिरी दरबार कार्यक्रम व पुरस्कार वितरण असे विविध कार्यक्रम गडावर होणार आहेत. उत्सवाचे यंदा ४४ वे वर्ष आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे यांनी दिली. कै.ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी आणि कै.शाहीर किसनराव हिंगे यांनी १९८० सालापासून शिवनेरी गडावर हा उत्सव सुरु केलेला आहे. तीच परंपरा पुढे चालू ठेवत शनिवारी श्री शिवाई मंदिर ते जन्मस्थळ अशी महाराजांच्या प्रतिमेची चांदीच्या शिवपालखीतून सवाद्य छबिना मिरवणूक निघेल. अनेक शिवप्रेमी युवक-युवतींसह अनेक शाहीर मिरवणुकीत सहभागी होणार आहे. श्रीजगद््गुरु तुकाराम महाराज यांचा प्रसाद म्हणून श्री क्षेत्र देहू संस्थानच्या वतीने श्री शिवछत्रपती शिवजयंती उत्सवानिमित्त दरवर्षी महावस्त्र पाठविले जाते. सज्जनगड येथील श्री समर्थ सेवा मंडळाच्यावतीने देखील महावस्त्र पाठविण्यात येणार आहे. शुक्रवारी (दि.१०) सकाळी ७ वाजता शिवजन्मस्थळावर सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते यांचे वंशज विक्रमसिंह बाजी मोहिते यांच्या हस्ते शिवाई मातेस अभिषेक व महापूजा होईल. त्यानंतर पालखी सोहळा व पारंपरिक पद्धतीने पंचक्रोशीतील महिला पाळणा म्हणून सकाळी ९ वाजता शिवजन्मोत्सव साजरा करतील. या सोहळ्यानंतर ध्वजारोहण होऊन शिवकुंजावर शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे सेवाव्रती शाहिरी दरबारहा पोवाडयाचा कार्यक्रम होणार आहे. पोवाडे गायन कार्यक्रमानंतर जाहीर अभिवादन सभा होईल. यावेळी ब्रिगेडियर (निवृत्त) प्रसाद जोशी, विक्रमसिंह बाजी मोहिते हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या अलका फुलपगार यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पंचक्रोशीतील पन्नास गावांमधून मोठया संख्येने शिवभक्त गडावर येणार असून महाराष्ट्रातील शिवप्रेमींनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन समितीचे कार्याध्यक्ष मधुकर काजळे यांनी केले आहे.* तिथीनुसार होणा-या शिवजयंती उत्सवात शासकीय सुटी जाहीर करावीकिल्ले शिवनेरीवर सन १९८० पासून तिथीनुसार शिवजयंती उत्सव साजरा होत असून या उत्सवास हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनीही मान्यता दिली होती. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सरकार सध्या कार्यरत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या उत्सवात सहभागी होऊन उत्सवास भरीव निधी द्यावा. तसेच तिथीनुसार होणा-या उत्सवानिमित्त शासकीय सुटी जाहीर करावी, असे आवाहन समितीचे अध्यक्ष आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे यांनी केले आहे.
