20/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

विश्वशांतीसाठी संवाद महत्वाचावन ग्लोब फोरमचे अध्यक्ष डॉ. दलबीर सिंग

Share Post

“भारत देश विविध धर्म व भाषांनी नटलेला आहे. हीच विविधता आपली मुख्य शक्ती असून ती सर्वांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे. या विविधतेमुळे मतभेद होणे स्वाभाविकच आहे. परंतू ती समजून घेतली तर मतभेदांचे रुपांतर मन भेदांमध्ये कधीही होणार नाही. हाच विश्वशांतीचा पाया असून तो समजून घेण्यासाठी संवाद होणे महत्वाचे आहे.” असे प्रतिपादन वन ग्लोब फोरमचे अध्यक्ष व काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव डॉ.दलबीर सिंग यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, जी २० इंटरफेथ अलायन्स फॉर सेफर कम्युनिटीज आणि यूएस येथील जी २० इंटरफेथ फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने राजबाग लोणी काळभोर येथील जगातील सर्वात मोठ्या विश्वशांती घुमटामध्ये आयोजित ‘जी २० इंटरफेथ समिट’च्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी यूएसए येथील जी२० इंटरफेथ फोरमचे अध्यक्ष डब्ल्यू कोल दुरहाम, जिऑर्जटाईम विद्यापीठाच्या प्रा. डॉ. कॅथरिना मार्शल, अमृता विश्वविद्यापीठम्चे अध्यक्ष स्वामी अमृतस्वरूपानंद पुरी, बिशप फेलिक्स मचाडो, अझरबैजान येथील धार्मिक गुरू शेख उल इस्लाम अल्लाहशुकूर पाशाझादे, बाही समुदायाच्या मार्जीया दलाल, डॉ. पुष्पिता अवस्थी या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.
तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते. एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल वि. कराड, कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस व प्र-कुलगुरू डॉ.मिलिंद पांडे उपस्थित होते.

डॉ.दलबीर सिंग म्हणाले, “प्रत्येकाला आपल्या धर्माचा अभिमान असतोच, परंतू त्याबरोबरच इतर धर्मांचा सन्मान ही तितकाच महत्वाचा आहे. ‘वसुधैव कुटुंबकम’च्या माध्यमातून भारताने संपूर्ण जगाला हाच संदेश दिला आहे. त्यामुळे विश्वशांती पुढे असणार्‍या समस्या दूर करून त्यासाठी एकत्रित येण्याची गरज आहे. त्यात एमआयटीचा पुढाकार उल्लेखनिय आहे.”
डब्ल्यू कोल दूरहाम म्हणाले, “डॉ. विश्वनाथ कराड यांच्या माध्यमातून विश्वशांतीची सुरू केलेली चळवळ आम्ही आणखी व्यापक स्वरूपात करू पाहत आहोत. त्यासाठी युवकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. भारताने ‘वसुधैव कुटुंबकम’चा दिलेला संदेश विश्वशांतीसाठी महत्चाचा आहे.
राहुल वि. कराड म्हणाले, “भारताने कायमच जगाला शांती व आत्मशांतीचा संदेश दिलेला आहे. सध्या आपण विविध पैलूंवर पुढाकार घेऊन अगे्रसर बनत आहोत. नुकतेच चांद्रयान ३ च्या माध्यमातून आपण आंतराळातील वैश्विक शक्तीच्या दिशेने वाटचाल केली आहे. या परिषदेच्या माध्यमातून आपल्या विविधतेच्या शक्तीच्या माध्यमातून जगाला आत्मशांतीचा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहोत. युवकांनी आता इंडिया या शब्दाऐवजी भारत असे संबोधणे गरजेचे आहे. ”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, “विज्ञान आणि आध्यात्माच्या समन्वयातून जगामध्ये सुख, समाधान आणि शांती नांदेल. भारत हा जगात विश्वशांतीचा संदेश देणारा देश म्हणून ओळखला जात आहे.”
यानंतर प्रा. कॅथरिन मार्शल, स्वामी अमृतस्वरूपानंद पुरी, अझरबैजान येथील धार्मिक गुरू शेख उल इस्लाम अल्लाशुकूर पाशाझादे आणि पुष्पिता अवस्थी यांनी विश्वशांतीसाठी सर्वांनी कोणती पाऊले उचलावीत आणि त्यासाठी कोणती भूमिका असावी यावर विवेचन केले.
प्रा. डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन व आभार व्यक्त केले.