विवो प्रो कबड्डी लीगचा मौसम पुण्यात 28 ऑक्टोबर ते 16 दरम्यान सुरू
विवो प्रो कबड्डी लीगच्या नवव्या मौसमातील 14 रंगतदार लढतींमुळे पुण्यातील कबड्डी प्रेमी खुश झाले असून श्री शिवछत्रपती क्रिडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे आणखी दोन आठवडे रंगणाऱ्या सामन्यांचा आनंद त्यांना घेता येणार आहे.
विवो प्रो कबड्डी लीगच्या पुण्यातील दुसऱ्या आठवड्याच्या प्रारंभी लीगचे मुख्य आयोजक मशाल स्पोर्टस् यांनी पुण्यात एका विशेष पत्रकारपरिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेला सर्व 12 संघांचे प्रतिनिधी आणि हेड स्पोर्टस् लीग, मशाल स्पोर्टस् आणि विवो प्रो कबड्डी लीगचे कमिशनर अनुपम गोस्वामी उपस्थित होते.
पुणेरी पलटण संघाचा कर्णधार फाजल अत्राचली याने पुणेकर चाहत्यांसाठी खास संदेश देताना सांगितले की, गेली तीन वर्षे आम्हाला या चाहत्यांची गैरहजेरी चांगलीच जाणवली होती. यावेळी पुन्हा त्यांच्यासमोर खेळताना आम्हाला खुपच आनंद होत आहे. कोणत्याही क्रिडा स्पर्धेला पाठीराख्यांशिवाय अर्थ नसतो. चाहते आम्हाला जोरदार प्रोत्साहन देत असताना दररोज खेळासाठी प्रेरणा देतात आणि आम्ही सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो. स्टेडियममध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहून आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल मी पुणेकर चाहत्यांचे आभार मानतो.
यू मुंबा संघाचा कर्णधार सुरींदर सिंग याने स्पर्धेच्या पाचव्या आठवड्याच्या निमित्ताने आपल्या संघाच्या कामगिरीचे विश्लेषण केले. बचाव हे आमचे बलस्थान असले तरी आमचे चढाईपटूही आता उत्तम कामगिरी करू लागले आहेत, असे सांगुन तो म्हणाला की, स्पर्धेच्या प्रारंभी चढाईपटूना सुर गवसत नव्हता. मात्र त्यांनी आता आपली कामगिरी उंचावली आहे.
यावेळी बोलताना लीग कमिशनर अनुपम गोस्वामी म्हणाले की, स्पर्धा आता अत्यंत रंगतदार टप्यावर आली आहे. पुढचे 35 ते 40 सामने अत्यंत निर्णायक ठरतील व गुण फलकतील पहिल्या 9-10संघामध्ये अनेक बदल होतील. ही स्पर्धा अतिशय स्पर्धात्मक होत असुन युवा खेळाडूंची कामगिरी पाहणे हा वेंगळाच अनुभव आहे. जयपूरचा अंकुश, बेंगळूरुचा भारत व तामिळ थलैवाज संघाचा नरेंदर यांनी नेत्रदीपक कामगिरी केली आहे.
विवो प्रो कबड्डी लीगच्या आगामी लढतींमध्ये पाटणा पायरेट्स विरुद्ध यु मुंबा, दबंग दिल्ली विरुद्ध जयपुर पिंक पँथर्स आणि युपी योद्धाज विरुद्ध पुणेरी पलटण या लढती शुक्रवारी रंगणार आहेत.
