विद्यार्थ्यांमध्ये कुशलता, उद्यमशीलता विकसित करण्यावर भर
“डिझाईन क्षेत्रातील नव्या संधी, तंत्रज्ञान व बदलते प्रवाह विद्यार्थ्यांनी समजून घ्यावे. विद्यार्थ्यांनी निवडलेले करिअर आत्मविश्वासाने घडवण्यासाठी डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठ प्रयत्नशील आहे. त्यांच्यातील कलागुणांना वाव देऊन, त्यांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी त्यांच्यामध्ये कुशलता, उद्यमशीलता विकसित करण्यावर इथे भर दिला जातो,” असे प्रतिपादन डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील यांनी केले. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. पी. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनात सुरु झालेल्या ताथवडे येथील डॉ. डी. वाय. पाटील स्कुल ऑफ डिझाईनच्या वतीने आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय डिझाईन समिटचे उद्घाटन डॉ. भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. डी. वाय पाटील अभिमत विद्यापीठ सोसायटीच्या विश्वस्त व कार्यकारी संचालक डॉ. स्मिता जाधव, प्रसिद्ध प्रेरक वक्ते सय्यद असद अब्बास, डिझाईन तज्ज्ञ व मार्गदर्शक रिखील नागपाल, स्कूल ऑफ डिझाईनचे संचालक डॉ. कुमार वेंकटरामन, सल्लागार अमित अग्रवाल आदी उपस्थित होते.देश-विदेशातील डिझाईन क्षेत्रातील व्यावसायिक आणि तज्ज्ञ मंडळींना एकत्र आणून या क्षेत्रातील नव्या संधी, प्रवाह, इनोव्हेशन्स व कल्पकता यावर चर्चा करण्याच्या उद्देशाने ही समिट महत्वाची ठरली. स्कुल ऑफ डिझाईनच्या मुलांनी तयार केलेल्या आकर्षक मॉडेल्सचे प्रदर्शन यावेळी भरविण्यात आले होते. पायरेट बोट, डिस्ने वर्ल्ड, आयफेल टॉवरच्या प्रतिकृती यासह विविध डिझाइन्सचे सादरीकरण झाले.या दोन दिवसांच्या समिटमध्ये ‘आर्ट ऑफ नेटवर्किंग’वर सय्यद असद अब्बास, डिझाईन क्षेत्राविषयी रिखील नागपाल, व्यंग्य चित्रांतून तणावमुक्ती यावर मुकीम तांबोळी, मॉड्युलर किचन डिझाईनवर भरत पाठक, एव्हीजीसी’वर (ऍनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स) या क्षेत्राविषयी सरकारचा दृष्टीकोन यावर मीडिया अँड एंटरटेनमेंट स्किल्स कौन्सिलचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहित सोनी, ‘एव्हीजीसी’ व डिजिटल मीडिया क्षेत्रातील करिअरच्या संधींवर ‘असिफा इंडिया’चे अध्यक्ष संजय खिमसेरा, तर ऑस्ट्रेलिया येथील किरुथीका अय्यर यांचे मार्गदर्शन सत्र झाले. ‘ब्रह्मास्त्र-१’ सिनेमासाठी अनिमेशन व व्हीएफएक्स करणाऱ्या जिगेश गज्जर यांच्या विशेष सत्राचा विद्यार्थ्यांनी आनंद घेतला.डॉ. स्मिता जाधव म्हणाल्या, “डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांना कौशल्य, रोजगार व उद्योगाभिमुख शिक्षण दिले जाते. मुलांना स्टार्टअप सुरु करण्यासाठी प्रोत्साहन देऊन त्यांच्यातील उद्योजक घडविण्याचा आमचा प्रयत्न आहे. डिझाईन क्षेत्रात २५-३० वर्षे अनुभव असलेल्या तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन या समिटमुळे विद्यार्थ्यांना मिळाले. त्यातून अनेक विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा मिळेल.””स्कुल ऑफ डिझाईनमध्ये अतिशय अत्याधुनिक सोयीसुविधा, तज्ज्ञ स्टाफ, क्षेत्र भेटी, प्रात्यक्षिकांवर आधारित शिक्षण दिले जाते. इंटर्नशिप, वर्कशॉप, सेमिनार, प्रदर्शने, विविध स्पर्धा यातून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षणामुळे त्यांच्यात वैश्विक दृष्टीकोन विकसित होतो. कम्युनिकेशन डिझाईन, गेमिंग, अनिमेशन, व्हीएफएक्स, फॅशन, इंटेरियर, प्रॉडक्ट डिझाईन अशा अनेक वाटा स्कुल ऑफ डिझाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या जात आहेत,” असेही डॉ. स्मिता जाधव यांनी नमूद केले.
रिखील नागपाल म्हणाले, “डिझाईन क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध आहेत. रोजगार आणि उद्योग दोन्ही प्रकारे तुम्हाला यामध्ये योगदान देता येईल. त्यासाठी या क्षेत्रातील नवे प्रवाह, तंत्रज्ञान आत्मसात करावे. कल्पकता, नाविन्यता आपल्या डिझाईनमध्ये असायला हवी. अशा प्रकारच्या समिट, प्रदर्शने यासाठी उपयुक्त ठरतात.”सय्यद असद अब्बास यांनी सांगितले की, कोणत्याही क्षेत्रात काम करताना नेटवर्किंग खूप महत्वाचे असते. आपण करत असलेल्या कामाविषयी आपल्या मांडणी करता यायला हवी. त्याचे मार्केटिंग उत्तम झाले, ते काम लोकांपर्यंत पोहोचले, तर त्याला योग्य न्याय व संधी मिळते. त्यामुळे आपण अभ्यासक्रम चांगल्या पद्धतीने शिकण्याबरोबरच संवाद कौशल्य आत्मसात करण्यालाही प्राधान्य द्यावे.”