विठू माऊलीने पूर्ण केली गायत्री जाधवची वारीची इच्छा
महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठू माऊलीची पंढरपूरची आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्रातला महाउत्सव. या महाउत्सवात वारक-यांची पाऊले पंढरीच्या दिशेने रवाना होतात. वारीमध्ये सामील होणारे प्रत्येकजण मनापासून रमतात, नाचतात, सेवा करतात आणि माऊली नामाच्या गजरात दंग होऊन जातात. आयुष्यात एकदा तरी वारी सोहळ्याचा अनुभव घ्यावा असं म्हणतात आणि माऊलींची इच्छा असेल तर तो योग जुळूनही येतो. यंदाच्या वर्षी अभिनेत्री गायत्री जाधव हिचा वारीमध्ये सहभागी होण्याचा योग जुळून आला.
गायत्रीने पुण्यात माऊलींची पालखी आली असताना त्यांचे दर्शन घेतले होते पण तिला रिंगण सोहळा अनुभवयाचा होता आणि अन्नदान देखील करायची इच्छा होती म्हणून गायत्रीने फलटणमध्ये एक दिवस वारक-यांसोबत वारीत चालण्याचा अनुभव घेतला आणि अन्नदान देखील केले.
वारीचा अनुभव, वारक-यांचा उत्साह आणि वारीमध्ये विठू माऊली आपल्यासोबतच असतात असं म्हणतात त्यामुळे हा अनुभव गायत्रीला अनुभवायाला मिळाला का, याविषयी विचारले असता, ती म्हणाली, “लहानपणापासूनच वारीविषयी मला प्रचंड आकर्षण होते. संपूर्ण महाराष्ट्रातून लोकं वारीसाठी आळंदीमध्ये एकत्र येतात आणि तिथून पुढे पंढरपूरला जातात. या सोहळ्याचं कोणी कोणाला आमंत्रण देत नाही तरी देखील मोठ्या संख्येने लोकं वारीमध्ये येतात आणि अतिशय शिस्तीने आपला प्रवास करतात. पंढरपूरला पोहचून दर्शन घेऊन आपापल्या घरी मुक्कामाला जातात. मला या मागचं रहस्य म्हणा किंवा त्यांच्या भावना जाणून घ्यायच्या होत्या म्हणून मी या वर्षी वारी केली.