‘वाळवी’ची हिंदी चित्रपटावर मात
१३ जानेवारीला प्रदर्शित झालेल्या परेश मोकाशी दिग्दर्शित ‘वाळवी’ या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर तिसरा यशस्वी आठवडा असून प्रेक्षकांचा या चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळत आहे. ‘पठाण’ सारखा बिग बजेट चित्रपट शर्यतीत असतानाही ‘वाळवी’ चित्रपटाने तिसऱ्या आठवड्यातही आपले स्थान कायम ठेवले आहे. यावरूनच मराठी प्रेक्षक ‘वाळवी’ला पसंती देत आहेत. या आठवड्यातही काही थिएटरमध्ये ‘वाळवी’चे शोज तिप्पट पटीने वाढवण्यात आले आहेत. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा होती. समीक्षक, मराठी सिनेसृष्टी, प्रेक्षक अशा सर्वांनीच ‘वाळवी’चे भरभरून कौतुक केले. प्रेक्षकांकडून भरभरून मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल झी स्टुडिओजचे बिझनेस हेड मंगेश कुलकर्णी म्हणतात, ‘’तिसऱ्या आठवड्यातही प्रेक्षकांकडून मिळणारा प्रचंड प्रतिसाद समाधान देणारा आहे. अनेक ठिकाणी प्रेक्षकांच्या आग्रहास्तव आणि प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद पाहून ‘वाळवी’चे शोज वाढवण्यात आले आहेत. सध्या ‘पठाण’ सारख्या बॉलिवूड चित्रपटाची चलती असतानाही ‘वाळवी’वरही प्रेक्षक तेवढेच प्रेम करत आहेत. हिंदी चित्रपटासमोर मराठी चित्रपट ताकदीने उभा आहे, हेच खूप आनंददायी आहे. मुळात मराठी प्रेक्षकवर्ग हा चोखंदळ आहे. चांगल्या कॅान्टेटला ते नेहमीच पसंती देतात आणि म्हणूनच ते असे चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघतात. झी स्टुडिओज नेहमीच नाविन्यपूर्ण विषय प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहे. ‘वाळवी’ हा सुद्धा असाच वेगळा विषय असून हा मराठीतील पहिला थ्रिलकॉम चित्रपट आहे. आतापर्यंत बॉक्स ऑफिसवरील ‘वाळवी’ला मिळणारा प्रतिसाद पाहता ‘वाळवी’ प्रेक्षकांचे प्रेम मिळवण्यात यशस्वी झाला आहे.” झी स्टुडिओज आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी ‘वाळवी’ची निर्मिती केली असून या चित्रपटाची कथा, पटकथा आणि सवांद परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांचे आहेत. स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते, शिवानी सुर्वे आणि नम्रता संभेराव यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत.