वारकरी संप्रदाय विश्वधर्मी व्हावा ह.भ.प.कृष्णा महाराज यांचे विचार
व्यक्ती स्वतःला विसरल्यामुळे भ्रमिष्ट झाला आहे. संभ्रमामुळे त्याला सतत दुःखाचा सामना करावा लागतो. दुःखातून सुखाकडे जाण्यासाठी संत साहित्याचे सतत वर्णन व श्रवण करावे. त्यातून मानवाला स्वतःची ओळख होते. वारकरी संप्रदाय मानवाला विषयांच्या भवसागरातून बाहेर काढू शकतो. तो सर्वश्रेष्ठ असल्याने विश्वधर्मी व्हावा.”असे विचार संतसाहित्याचे गाढे अभ्यासक हभप डॉ. नारायण महाराज जाधव यांचे शिष्य हभप कृष्णा महाराज यांनी प्रथम पुष्प गुंफतांना व्यक्त केले.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘श्रीसंत ज्ञानेश्वर-तुकाराम ज्ञानतीर्थ’,विश्वरूप दर्शन मंच, श्रीक्षेत्र आळंदी येथे संत शिरोमणी तत्त्वज्ञ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७२७ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्ताने लोकप्रबोधनपर आयोजित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
तसेच योगगुरू मारुती पाडेकर, डॉ. सुदाम महाराज पानेगावकर व विष्णू भिसे उपस्थित होते.
हभप कृष्णा महाराज म्हणाले,” विषय सागरामध्ये व्यक्ती स्वतःचे स्वरूप विसरला आहे. संतांच्या आर्शीवादाने पुन्हा तो स्वतःला ओळखू शकतो. त्यातूनच आपली मुक्तता सहज सिद्ध होऊ शकते. हे जीवन सार्थकी लावण्यासाठी संतांचे चरित्र व त्यांच्या जीवनाचा अभ्यास करावा. संत हे कपाशी सारखे म्हणजे निरस, शुद्ध, गुणमय असतात. त्यांच्या सान्निध्यात मानवाच्या जीवनाचे कल्याण आहे.”
त्यानंतर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार व बीड येथील श्री भगवानबाबा वारकरी शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष हभप अर्जुन महाराज लाड गुरूजी यांचे कीर्तन झाले. तसेच कलर मराठी वरील सुर नवा ध्यासच्या प्रियंका ढेरे चौधरी व सहकारी यांचा अभंगवाणीचा कार्यक्रम झाला.
नंतर इंद्रायणी मातेची आरती झाली.
हभप शालीकराम खंदारे यांनी सूत्रसंचालन व महेश महाराज नलावडे यांनी आभार मानले.