वायुपुत्र हनुमानाच्या २१ फूट उंच मूर्ती स्थापित
बुद्धी, शक्ती आणि भक्ती काय असते हे पवनपुत्र हनुमानाकडे पाहिल्यावर कळते. विद्यार्थ्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्व विकासाचे स्त्रोत यामध्ये दडलेले आहे. आज हा कॅम्पस खर्या अर्थाने ज्ञानतीर्थ क्षेत्रात परिवर्तीत होतांना आनंद वाटत आहे. असे विचार गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये यांनी व्यक्त केले.
माईर्स एमआयटी, पुणे या शिक्षण संस्थेने लोणी काळभोर येथील एमआयटी एडीटी विद्यापीठ परिसरात विशाल सर्वांगसुंदर गदाधारी हनुमानाची २१ फुट उंच मूर्तीची विधिवत पूजा तीन चिरंजीव आर्यव्रत राहुल कराड, विरेंद्र प्रताप मंगेश कराड व श्रीराम नागरे यांच्या हस्ते करून स्थापित करण्यात आली.एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या संकल्पनेतून वायुपुत्र हनुमानाची मूर्तीची स्थापना करण्यात आली.
यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल वि. कराड, एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण, मुकेश शर्मा, सौ.उषा विश्वनाथ कराड, डॉ. अदिती कराड, डॉ. सुचित्रा नागरे व डॉ. सुनिता कराड उपस्थित होते.
डॉ. संजय उपाध्ये म्हणाले, कृष्ण व अर्जुनाच्या रथावर जो झेंडा लावण्यात आला होता त्यावर बाहुबली मारूतीची प्रतिमा होती. त्यामुळे असे स्पष्ट होते की प्रथम महाभारत नाही तर रामायण घडल होत. या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना ही मुर्ती सतत सकारात्मक प्रेरणा देत राहणार आहे. त्यामुळे शिक्षक रोज येथे आले तर विद्यार्थी त्याचे अनुकरण करतील.
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, भारतीय संस्कृतीचे मुर्तीमंत प्रतिक आज या प्रांगणामध्ये साकार झाले आहे. जीवन कसे जगावे आणि कसे जगू नये याचे तत्वज्ञान अंजनीच्या सुपुत्राकडे पाहिल्यावर कळते. श्रध्दा, भक्ती, शक्ति व बुद्धिमत्तेचे प्रतिक वायुपुत्र हनुमान यांची प्रेरणा सतत विद्यार्थ्यांना मिळत असते. हनुमानाचा हा विशाल पुतळा जणू या परिसराचा गाभाच ठरणार आहे. येथे भक्ती व शक्तीचा एक अनोखा संदेश केवळ संस्थेच्या विद्यार्थ्यांमध्येच नव्हे तर संस्थेला भेट देणार्या इतर सर्वांपर्यंत पोहोचेल
डॉ. मंगेश तु. कराड म्हणाले, आज युवा पिढी व्यसनाधीन होत चाललेली आहे. त्यामुळे बजरंगबली हा आदर्श युवा पिढी समोर ठेवणे गरजेचे आहे. यांच्याकडे पाहिल्यावर शरीर बलशाली बनविण्याची प्रेरणा सतत मिळत असते. काळानुसार छत्रपती शिवाजी महाराज आणि वायुपूत्र हनुमान यांचा आदर्श सर्वांनी ठेऊन त्यांचे विचार आचरणात आणावे.
१९८३ साली माईर्स एमआयटी, पुणे संस्थेची स्थापना झाली. संस्थेचे संस्थापक व ज्येष्ठ शिक्षणतज्ञ विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी संस्थेचे विद्यार्थी हे शरीराने कणखर, मनाने सजग आणि अध्यात्मिकदृष्ट्या उन्नत असावेत अशी आशा व्यक्ती केली होती. तसेच संत श्री ज्ञानेश्वर महाराज व तत्त्वज्ञ संत श्री तुकाराम महाराज ते तत्त्वज्ञ शास्त्रज्ञ डॉ. आल्बर्ट आईन्स्टाईन यांचे अधिष्ठान बाळगून आणि भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंद यांना आदर्श मानून संस्थेमध्ये मूल्याधिष्ठित वैश्विक शिक्षण पद्धतीचा अवलंब करीत आहेत.