वाचन न करणारे आउट ऑफ डेट होतात – ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर
आधुनिक काळात दोन ते पाच वर्षांमध्ये ज्ञान बदलत असून, त्यात भरपूर वाढ होत आहे. त्यामुळे आपण पुस्तकांच्या माध्यमातून ज्ञानार्जन करायला हवे. त्यातूनच नवसर्जनशिलता निर्माण होणार आहे. अशा पद्धतीने ज्ञानार्जन न करणारे व्यक्ती आउट ऑफ डेट होतील, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या ( नॅशनल बुक ट्रस्ट) वतीने पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन २४ डिसेंबरपर्यंत करण्यात आले आहे. या महोत्सवात ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर यांची मुलाखत सागर देशपांडे यांनी घेतले. यावेळी महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी डॉ. माशेलकर यांचा सत्कार केला.
डॉ. माशेलकर म्हणाले की, वाचायला लागल्यावर, तुमचा शब्दसंग्रह उत्तम होतो. याचा फायदा तुम्हाला लिहायला आणि वक्तृत्वाच्या दृष्टीने उत्तम होतो. विविध अँगल समजतात. त्यामुळे आपण वाचन करायला हवे. एखादी गोष्ट तुम्हाला प्रभावीपणे कमी वाक्यात मांडायची असल्यास, तुमच्याकडे प्रभावी शब्दसंग्रह हवा. त्यासाठी पुस्तके वाचनासाठी वेळा काढायला हवा. मला रहस्यकथा आवडतात. त्याचप्रमाणे आत्मचरित्रावरील पुस्तके वाचायला आवडतात. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. एपीजे अब्दुल कलाम, सचिन तेंडुलकर अशा व्यक्तीमत्त्वाची पुस्तके खूप भावली, असे डॉ. माशेलकर यांनी सांगितले.
डॉ. माशेलकर म्हणाले की, मी महापालिकेच्या शाळेत मराठी माध्यमात शाळेत शिकलो. शाळा महापालिकेची होती, तरी माझ्या जडणघडणीवर परिणाम झाला नाही. शाळेत असल्यापासूनच, मला वाचनाची भरपूर आवड होती. एखादे पुस्तक हाती पडले, की ते पूर्ण वाचूनच सोडायचो. नव्या पुस्तकांचा सुगंध मला फाटा आवडतो. लहानपणी माझ्या प्रवासात साधारण दररोज २० मिनिटांचा वेळ जायचा. यावेळी पुस्तक वाचायचो. लहानपणी संजय, बालमित्र, मंथन अशी अनेक मासिके वाचायचो आणि त्यात लिहायचो. त्यावेळी माझ्या अनेक लेखांना पारितोषिकेही मिळायची. मृत्युंजय, ययाती, प्रकाशवाटा,मंतरलेले दिवस अशी अनेक पुस्तके माझ्या जवळची आहेत, असे डॉ. माशेलकर यांनी सांगितले.
….
कोट
..
पुणे शहर हे अनेक महोत्सवांचे शहर आहे. या महोत्सवात आता पुणे पुस्तक महोत्सवाची भर पडली आहे. या पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने नागरिकांना विविध विषयांवरील पुस्तके वाचण्याची संधी मिळत आहे. वाचन संस्कृती वाढविण्यासाठी ही चांगली बाब आहे.
- डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ