‘लाईफ लॉन्ग लर्निंग’ उपक्रमांतर्गत सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्येउच्च शिक्षणासाठी कर्मचारी, व्यावसायिकांना शिष्यवृत्तीची संधी
“सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने विविध कंपन्यात कार्यरत नोकरदार, कर्मचारी, ‘सूर्यदत्त’मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक, निवृत्त नागरिक, गृहिणी, पोलीस, पत्रकार, निवृत्त सैनिक व कोरोना पीडित, स्वयंसेवी संस्थेत राहणारे व अनाथ विद्यार्थी, स्टार्टअप व व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत व्यक्तींना पदविका, पदवी व पदव्युत्तर पदवी अशा उच्च शिक्षणासाठी लाइफलॉंग लर्निंग उपक्रमांतर्गत ७५ लाखाची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे,” अशी माहिती ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सूर्यदत्त’च्या उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, कार्यकारी विकास अधिकारी सिद्धांत चोरडिया, संचालक प्रा. अक्षित कुशल, प्रा. प्रशांत पितालिया, सल्लागार डॉ. शैलेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “सूर्यदत्त एज्यु-सोशियो कनेक्ट & सीएसआर इनिशिएटिव्ह द्वारे ‘सर्वांसाठी शिक्षण’ अंतर्गत ही ७५ लाखांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचा रौप्य महोत्सव या दोन्हीचे औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे यंदाही ही शिष्यवृत्ती दिली जात आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व अन्य विद्यापीठाशी संलग्नित, तसेच राज्य शिक्षण मंडळ व शासनमान्य अर्धवेळ किंवा डिस्टन्स लर्निंग किंवा अल्प कालमर्यादेत प्रमाणपत्र अभ्यासक्रम जे शनिवार-रविवार शिकता येतील अशा अभ्यासक्रमांकरिता या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार आहे. दहावी, बारावी व पदवीनंतरचे विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. नोकरी करत अर्धवेळ शिक्षण घेणाऱ्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी असते. यंदा शिष्यवृत्ती योजनेचे बारावे वर्ष असून, गेल्या ११ वर्षात १४०० पेक्षा अधिक नोकरदार विद्यार्थ्यांनी चार कोटी रुपयाच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेतला आहे.
सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स दर्जेदार, संशोधनात्मक शिक्षण, सर्वांगीण विकास आणि तज्ज्ञ व्यवस्थापन असलेली शिक्षण संस्था म्हणून ओळखली जाते. सोबतच सामाजिक जागरूकता जपत विविध उपक्रम संस्थेत राबवले जातात. याचाच एक भाग असलेल्या या शिष्यवृत्ती योजनेत निवृत्त झालेल्या व्यक्तींना बराचसा वेळ शिल्लक असतो. त्यांना काही अभ्यासक्रम शिकता येतील. तसेच त्यांना आपल्या वेळेचा सदुपयोग करता येईल. पोलीस व पत्रकारांसाठीही काही अभ्यासक्रम उपलब्ध करण्यात आले असून, त्यांना स्वतःला अद्ययावत करण्यासाठी शिक्षण घेता येणार आहे. त्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. गृहिणींना घर सांभाळून शिकता येणारे अनेक अभ्यासक्रम विविध विद्यापीठामार्फत उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सैन्यातून निवृत्त झालेल्या सैनिकांना पुढील शिक्षण घेऊन पुन्हा करिअर करता यावे, यासाठी शिष्यवृती उपलब्ध करून दिली जाणार आहे,” असे प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले.
“या शिष्यवृत्ती योजनेंतर्गत सूर्यदत्त संस्थेच्या कोणत्याही महाविद्यालयात वेगवेगळ्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार आहे. भारत फोर्ज, आयडीबीआय, टाटा ग्रुप, झेडएफ यांसारख्या १०० पेक्षा अधिक कंपन्यांना आपल्या संस्थेतील चांगल्या कर्मचाऱ्यांची शिफारस करण्याची विनंती करण्यात आली आहे. तसेच पुण्यातील माहेर, जनसेवा फाउंडेशन, लायन्स क्लब, रोटरी क्लब अशा विविध सामाजिक संस्थांना, विविध प्रतिष्ठित व्यक्तींना या शिष्यवृत्तीसाठी चांगल्या व होतकरू व्यक्तींची शिफारस करण्याची विनंती करत आहोत. उमेदवार २२ ते ५० या वयोगटातील असणे आवश्यक आहे,” असे प्रा. डॉ. चोरडिया यांनी नमूद केले.
अर्ज करण्याची अंतिम तारीख २० जुलै २०२३ आहे. कंपन्यांच्या सीईओ/एचआर, सामाजिक संस्थांचे प्रमुख, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना विनंती करण्यात येते की पात्र व इच्छूक होतकरु उमेदवारांची नावे १५ जुलैपर्यंत पाठवावीत. तज्ज्ञ समितीकडून आलेल्या अर्जाची छाननी करून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्यांची अंतिम यादी १० ऑगस्ट २०२३ नंतर जाहीर केली जाईल. अधिक माहिती व अर्ज भरण्यासाठी www.suryadatta.org या संकेतस्थळाला भेट द्यावी. शंका निरसनासाठी किंवा इच्छुकांनी आवडीच्या अभ्यासक्रमासाठी आवश्यक कागदपत्रांसह प्रशांत पितालिया (८९५६९३२४००) किंवा नयना गोडांबे (७७७६०७२०००) यावर व्हाट्सअप करावे, असे आवाहन प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी केले आहे.
