23/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

राष्ट्र निर्माणासाठी सिंधी समाजाचे योगदान उल्लेखनीय : राजनाथ सिंह

Share Post

”स्वातंत्र्यानंतर भारतात स्थायिक झालेल्या सिंधी समाजाचे राष्ट्र निर्माण आणि समाजाच्या जडणघडणीमध्ये उल्लेखनीय योगदान आहे. स्वातंत्र्य चळवळीतही सिंधी समाजाचा सहभाग व योगदान मोठे आहे. भारताचे वीर क्रांतिकारी, स्वातंत्र्यसेनानी शहीद हेमू कालानी यांनी तरुणपणात स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होऊन हसत हसत फाशीची शिक्षा स्वीकारली. त्यांचे हे बलिदान कधीही विसरता येणार नाही. स्वातंत्र्यावेळी झालेल्या फाळणीनंतर भारतात येऊन जिद्दीने आणि अथक प्रयत्नांनी सिंधी समाजाने आपले विशेष स्थान निर्माण केले आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सिंधी समाजाच्या २७ व्या आंतरराष्ट्रीय संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी केले.

सुहिंना सिंधी-पुणे आणि अलायन्स ऑफ ग्लोबल सिंधी असोसिएशन (AGSA) च्या वतीने २७ व्या आंतरराष्ट्रीय सिंधी संमेलनाचे आयोजन पुण्यातील कोरियंथन्स क्लब येथे करण्यात आले आहे. हे संमेलन पुढील तीन दिवस असणार आहे. या कार्यक्रमात केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे दृश्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. यावेळी साई सद्रामजी, संत कंवररामचे गद्दिशान साई राजेशलाल, एजीएसएचे अध्यक्ष दत्तुक शाह, आयोजक सुहिंना सिंधी पुणेचे अध्यक्ष डॉ पितांबर (पीटर) धलवाणी, आफ्रिकेचे वाणिज्य दूत रमन दासवानी, मोहन दुदाणी, दीपक रामचंदाणी, हिरो शिवदासानी, भारतीय सिंधु सभेचे अध्यक्ष लधाराम हगवानी, भाजपा मध्य प्रदेशचे महासचिव भगवानदास सबनानी, गुजरातचे माजी मंत्री परमानंद खट्टर, माजी खासदार सुरेश केसवाणी, माजी आमदार डॉ गुरमुख जगवानी, स्पेनचे सतीश रायसिंघानी, सिंधी कौन्सिल ऑफ इंडियाचे मोहन लधानी यांच्यासह सिंधी समाजातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

आंतरराष्ट्रीय सिंधी संमेलनाला शुभेच्छा देताना राजनाथसिंह म्हणाले, ”कोणताही समाज अथवा समुदाय स्वत:ला विकसित करण्यासाठी तेव्हाच यशस्वी होतो जेव्हा तो आपली परंपरा, संस्कृती आणि भाषेचे महत्त्व समजून त्याला प्रोत्साहन देतो. याशिवाय नव्या प्रतिभेला प्रोत्साहन देईल, आव्हानांचे आकलन करेल आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी एकत्र येऊन प्रयत्न करेल तेव्हाच विकासाची द्वारे खुली होतात. आयोजित केलेले हे संमेलन हा उद्देश पूर्ण करण्यात नक्कीच यशस्वी होईल, असे मला वाटते”.

दीप्रज्वलन करून शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये उंट, घोडे, अश्वगाडी, बँड पथक सहभागी होते. सुमारे ४० देशातून सहभागी झालेले सुमारे एक हजार सिंधी नागरिक या संमेलनात सहभागी झाले आहेत. सजवलेल्या बग्गीतून साई सद्राम (सिंध) शोभायात्रेत सहभागी झाले. यावेळी त्यांनी आशीर्वाद दिले. दिव्याच्या आरास असलेली बग्गी, रथ, सजलेले घोडे, उंट सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते.

यावेळी साधू वासवानी मिशनचे जे. पी. दादा वासवानी यांचा आशीर्वादपर व्हिडिओ दाखवण्यात आला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कविता इसरानी, २०१३ च्या मिस इंडिया सिमरन अहुजा, किशन रामनानी, मोहित शेरवानी यांनी केले. पिंकीजा इदासानी, मंजुजी आसुदानी, नील तलरेजा यांचा सांस्कृतिक कार्यक्रम या संमेलनात झाला.