राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा २२ फेब्रुवारी पासून पुण्यात
पुणे जिल्हा आणि महानगर बॅडमिंटन संघटना (पीडीएमबीए) यांच्या वतीने आयोजित डॉ. सायरस पूनावला आणि वेंकीज यांच्या सहकार्याने ८४ वी योनेक्स सनराईज वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा : ४५० पेक्षा अधिक खेळाडूंचा सहभागसाईना नेहवालसह प्रमुख खेळाडूंची उपस्थितीपुणे : पुणे जिल्हा आणि महानगर बॅडमिंटन संघटना (पीडीएमबीए) यांच्या वतीने ८४ व्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २२ ते २८ फेब्रुवारी दरम्यान म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडानगरीत होणार आहे. १९९७ मध्ये ही स्पर्धा पुण्यात झाली होती त्या नंतर २५ वर्षांनी हा मान पुन्हा पुण्याला मिळाला आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत ऑलिम्पियन पदक विजेती साईना नेहवालसह अव्वल बॅडमिंटनपटू सहभागी होणार आहेत, अशी माहिती पुणे जिल्हा आणि महानगर बॅडमिंटन संघटनेचे (पीडीएमबीए) अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे आणि सचिव रणजित नातु यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी शशांक हळबे, राजीव बाग, सारंग लागू, केतकी देशपांडे, सुधांशु मेडसिकर उपस्थित होते.डॉ. सायरस पूनावाला आणि वेंकीज यांचे या स्पर्धेला प्रमुख प्रायोजकत्व लाभले आहे. या स्पर्धेसाठी आतापर्यंत साडेचारशेहून अधिक खेळाडूंचा सहभाग असणार आहे. यात साईना नेहवाल, एच. एस. प्रणॉय, लक्ष्य सेन, सात्त्विकसाईराज रांकिरेड्डी, चिराग शेट्टी, पी. कश्यप, मालविका बनसोड, गायत्री गोपीचंद, त्रिशा जॉली या अव्वल खेळाडूंचा सहभाग आहे. वैयक्तिकसोबतच सांघिक स्पर्धाही होईल. यात सात संघ सहभागी झाले आहेत.गेल्या वेळी वरिष्ठ गटाची राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा २०१८ मध्ये झाली होती. त्यात सौरभ वर्माने लक्ष्य सेनला पराभूत करून विजेतेपद पटकावले होते. महिला एकेरीत विजेतेपदाचा मान साईना नेहवालला मिळाला होता. तिने पी. व्ही. सिंधूला पराभूत केले होते. पुरुष दुहेरीत प्रणव चोप्रा-चिराग शेट्टी यांनी बाजी मारली होती, तर अर्जुन एम. आर.-श्लोक रामचंद्रन यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत शिखा गौतम-अश्विनी भट यांनी मेघना जक्कामपुडी-पूर्विशा रामला हरविले होते. मिश्र दुहेरीत मनू अत्री-मनीषा के.ने जेतेपद मिळवले होते. एअरपोर्ट अथाॅरिटी ऑफ इंडियाने रेल्वेला पराभूत करून सांघिक स्पर्धा जिंकली होती.पूना गेम ॲप ठरणार महत्त्वपूर्णराष्ट्रीय स्पर्धेसाठी पूना गेम ॲप तयार करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी हे ॲप विशेष तयार करण्यात आले आहे. प्रथमच अशा ॲपचा कोणत्याही स्पर्धेसाठी उपयोग होईल. या ॲपवरून स्पर्धेची सर्व माहिती मिळणार आहे. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना या ॲपद्वारे स्पर्धेचे सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण बघता येणार आहे. प्रत्येक दिवसाचे दैनंदिन सामने यात बघता येईल. तशी लिंक येथे उपलब्ध असेल. खेळाडूंची विशेष व्यवस्थाया स्पर्धेसाठी देशभरातील अव्वल खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यांची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांची राहण्याची व्यवस्था पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. असे पहिल्यांदाच घडले आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मागील सहा महिन्यांपासून १५० स्वयंसेवक रात्रं-दिवस काम करीत आहेत. याआधी स्पर्धेचे वातावरण निर्माण करण्यासाठी पुण्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी काउंटडाउनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अशी माहिती रणजीत नातु यांनी दिली.