‘विश्वधर्मी मानवता’ पुरस्काराने प्रा.डॉ. विश्वनाथ कराड सन्मानित ; खासदार राणा यांच्या हस्ते सन्मान
पुणे ,(ता .0४ ) : विश्व शांती, शिक्षण व मानवतेसाठी आयुष्य वेचणारे विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ कराड यांचा वंदनीय ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विश्वधर्मी मानवता पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. त्यांना हा पुरस्कार अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवामंडळ श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम मोझरी जिल्हा अमरावती तर्फे आश्रमाच्या अध्यक्षा पुष्पा बोंडे व खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला.यावेळी, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एम.पठाण यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज संस्थापित अखिल भारतीय श्रीगुरूदेव सेवामण्डल, श्रीक्षेत्र गुरूकुंज मोझरी तर्फे राष्ट्रसंत श्री तुकडोेजी महाराज यांची ५५ वीं पुण्यतिथी महोत्सव साजरी करण्यात आली. यावेळी लाखो भक्तांसमोर डॉ. कराड यांचा सन्मान करून पुरस्काराच्या स्वरूपात राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा पुतळा सन्मानपत्र, शाल आणि श्रीफळ देण्यात आले.
सत्काराला उत्तर देताना विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, ‘भारतीय संस्कृती दर्शन या नावाखाली प्रत्येक विद्यापीठाने आपल्या पाठ्यक्रमात ग्रामगीतेचा समावेश करायला हवा.येथे देशभरातील विद्यापीठातील कुलगुरूंना बोलवून त्यांना ग्रामगीतेचा खरा अर्थ समजावून सांगायला पाहिजे .शिस्त, श्रध्दा, निष्ठा, भक्ती आणि कर्मयोग या शब्दांचा अर्थ येथे कळतो. हेच खर्या अर्थाने मानव तीर्थक्षेत्र आणि ज्ञानतीर्थ बनेल. स्वामी विवेकांनदांच्या विचारानुसार २१ व्या शतकात भारत विश्वगुरू बनून संपूर्ण मानव जातीला सुख आणि शांतीचा मार्ग दाखवेल.
डॉ.एस.एन.पठाण म्हणाले, ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मरणोत्तर भारत रत्न देऊन त्यांचा सन्मान करावा. ग्रामगीता ही ग्रामीण जीवनातील व्यक्तीचे दर्शन घडवून त्यांना मार्गदर्शन करणारी आहे.तर आश्रमाच्या अध्यक्षा पुष्पा बोंडे म्हणाल्या, ‘राष्ट्रसंत तुकडोमहाराज यांची शक्ती चराचरात वास करते. त्या शक्तीला डॉ. कराड यांनी मानले. त्यानंतर संत ज्ञानेश्वर व तुकाराम यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या डोम मध्ये तुकडोजी महाराज यांचा १२ फूटांचा पुतळा उभारून त्यांचे साहित्य व विचार संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे.