NEWS

राजकीय हिंदूत्व पुन्हा निर्माण करणे ही काळाची गरज

Share Post

हिंदुस्थानवर परकीय आक्रमणे शेकडो वर्षांपासून होत आहेत. इस्लाम धर्मियांच्या आक्रमणांनी हिंदू संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या विचारसरणीतूनच पुण्यातील पुण्येश्वर महादेवाचे मंदिर पाडण्यात आले. राजकीय हिंदुत्व पुन्हा निर्माण करणे ही काळाची गरज असून त्यासाठी पुण्येश्वर महादेव मंदिराची पुर्नस्थापना व्हायलाच हवी, अशी भावना माजी खासदार प्रदीप रावत यांनी व्यक्त केली. राजे शिवराय प्रतिष्ठान तर्फे जय शिवराय चौक, कर्वेनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती उत्सवात २१ वर्षीय हुतात्मा जवान यश देशमुख यांना नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे पुरस्कार आणि पंचशील आश्रमाच्या माध्यमातून आदिवासी भागात शिक्षणाची गंगा पोहोचविणा-या स्व. के.मधुकरराव यांना मरणोत्तर स्व. ज्ञानेश पुरंदरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ ज्ञानेश सेवा समर्पण पुरस्कार प्रदान करण्यात आले. शिवजयंती महोत्सवानिमित्त शिवप्रेरणा मंदिर – पुण्येश्वर मंदिर पुननिर्माण संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी जगद््गुरु तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प.शिरीष महाराज मोरे, प्रतिष्ठानचे संस्थापक महेश पवळे, माजी नगरसेविका वृषाली चौधरी, युवा उद्योजक परिक्षीत थोरात, कुणाल कांबळे, पुण्येश्वर महादेव मंदिर स्थापना समितीचे प्रमुख सुनील तांबट, सामाजिक कार्यकर्ते चित्रसेन खिलारे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी खरात, संघटक विक्रम बर्गे, स्वप्नील महाडीक, सनी येळवंडे व उत्सव प्रमुख अक्षय जाधव आदी उपस्थित होते. प्रदीप रावत म्हणाले, हजारो वर्षांपासून हिंदुस्तान परकीय आक्रमणाच्या विरोधात लढत आहे. इस्लाम धर्मियांनी हिंदुस्थानाची संस्कृती नष्ट करण्याचा वारंवार प्रयत्न केला. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या धुरंदर योद्ध्यांनी हा प्रयत्न हाणून पाडला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्र्यातून प्रेरणा घेऊन आपण पुन्हा एकदा पुण्येश्वर महादेवाच्या मंदिराची स्थापना केली पाहिजे. शिरीष महाराज मोरे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घराघरात पोहोचवला पाहिजे. त्यांच्या नावाचा केवळ जयघोष न करता त्यांचा विचार आपल्या आयुष्यामध्ये उतरवला पाहिजे आणि त्यांच्या विचारांप्रमाणे आपले आयुष्य जगले पाहिजे. महेश पवळे म्हणाले, इस्लामच्या विचारांच्या प्रेरणेतूनच पुण्यातील पुण्येश्वर महादेवाचे मंदिर पाडून त्या ठिकाणी मशिद बांधण्यात आली. आज आपण हिंदूंनी एकसंध होऊन पुण्येश्वर महादेवाचे मंदिर पुन्हा स्थापन करण्यासाठी चळवळ उभारली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. पुरस्कार समारंभापूर्वी शाहीर श्रीकांत रेणके यांचा गर्जना सह्याद्रीची हा पोवाडयाचा कार्यक्रम झाला. शिवप्रेरणा मंदिराचा देखावा तयार करणारे शिल्पकार महेश रांजणे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.फोटो ओळ : राजे शिवराय प्रतिष्ठान तर्फे जय शिवराय चौक, कर्वेनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती उत्सवात २१ वर्षीय हुतात्मा जवान यश देशमुख यांना नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे पुरस्कार आणि पंचशील आश्रमाच्या माध्यमातून आदिवासी भागात शिक्षणाची गंगा पोहोचविणा-या स्व. के.मधुकरराव यांना मरणोत्तर स्व. ज्ञानेश पुरंदरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ ज्ञानेश सेवा समर्पण पुरस्कार प्रदान करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *