राजकीय पक्ष, कलाकार, पत्रकार, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते भिडणार क्रिकेटच्या मैदानात
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीम योद्धा फाउंडेशन आयोजित क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि छत्रपती कलाकार लीग निमंत्रित स्वर्गीय डी.बी देवधर स्मरणार्थ मैत्री बॉक्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा येत्या २९,३०, आणि ३१ मे २०२३ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या क्रिकेट लिगाच्या लोगो आणि सहभागी टीमच्या टी-शर्ट चे अनावरण राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे प्रमोद नाना भानगिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब बोडके, आर पी आय चे परशुराम वाडेकर,उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे गजानन थरकुडे,भाजप चे धीरज घाटे, मनसे चे सागर पाठक,सामाजिक संस्था तर्फे लिज्जत पापड चे सुरेश कोते, कलाकार तर्फे अभिनेत्री प्रिया बेर्डे, चेतन चावडा,अभिजित कोठवालकर आयोजक ॲड मंदारभाऊ जोशी- भीमयोद्धा फाउंडेशन,संदीप खर्डेकर- क्रिएटिव्ह फाउंडेशन,रमेश परदेशी- छत्रपती कलाकार लीग यांच्यासह जितेश दामोदरे, भारत भोसले, गणेश गायकवाड आदि मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, अनेकदा दैनंदिन आयुष्यात राजकारणात भाष्य करताना एकमेकांबद्दल मनात कटुता नसतानाही कडू बोलावं लागतं. ही कटूता संपावी या उद्देशाने भीम योद्धा फाउंडेशनच्या वतीने राजकीय पक्ष, कलाकार, पत्रकार, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते यांच्यासाठी मैत्री बॉक्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये राजकीय पक्ष कार्यकर्ते, कलाकार, पत्रकार, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पाटील यांनी केले.
मैत्री बॉक्स प्रीमियर लीग क्रिकेट लीग बद्दल माहिती देताना ॲड मंदारभाऊ जोशी म्हणाले, या स्पर्धेत भाजप, शिवसेना, कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, मनसे, मराठी उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, पत्रकार आणि कलाकार यांच्या टीम सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा येत्या २९,३०, आणि ३१ मे २०२३ रोजी गेम ऑन स्पोर्ट्स ग्राऊंड, म्हात्रे पुलाजवळ, कर्वेनगर, कोथरूड येथे सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत रंगणार आहे.