‘रक्षा पृथ्वीची’ उपक्रमांतर्गत चिमुकल्यांकडून १७०० सीडबॉल्स तयार
श्री शनी मारुती बाल गणेश मंडळ व इन्फिनाईट व्हेरिएबल यांच्यावतीने एरंडवणे येथील अखिल पूरग्रस्त वसाहत क्रीडा संकुल मैदान १० चाळ परिसरातील चिमुकल्यांनी व नागरिकांनी अवघ्या 2 तासात १७०० सीड बनवून निसर्गाप्रती आपले कर्तव्य पार पाडले.
‘रक्षा पर्यावरणाची’ या उपक्रमांतर्गत या बॉल्समध्ये जांभूळ, सिताफळ, पपई, चिक्कू, बाभळ, कलिंगड, चिंच यांसारख्या देशी झाडांच्या बिया टाकण्यात आल्या. पर्यावरण प्रेमी पुष्पा नवले आणि पर्यावरण अभ्यासक प्रा. अर्चना कल्याणी यांनी सीडबॉल बनविण्याचे प्रशिक्षण दिले तसेच सीडबॉल बनविण्याचे महत्त्व उपस्थितांना सांगितले. जागतिक पर्यावरण दिवसनिमित्त या सीडबॉल्सचे वाटप करण्यात येणार आहे. झाडे लावून पर्यावरणाला मोठ्या हानी पासून आपण वाचवू शकतो आणि येणाऱ्या पिढीला एक सुंदर आयुष्य देवू शकतो या संकल्पनेतून हा उपक्रम दोन्ही संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष सचिन पवार, इन्फिनाईट व्हेरिएबलचे संस्थापक अर्णव फडणवीस, सीओओ अभिषेक राठोड, स्वामिनी पंडित, रोहन भारद्वाज, राहुल मारणे, गणेश शेलार आदि उपस्थित होते. या उपक्रमात चिमुकल्यांनी उत्स्पुर्तपणे सहभाग घेतला.