मोहित चौहानने गायले ‘घर बंदूक बिरयानी’
झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे प्रस्तुत, हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित ‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपटातील ‘गुन गुन’, ‘आहा हेरो’ गाणे प्रदर्शित झाल्यानंतर आता या चित्रपटाचे ‘घर बंदूक बिरयानी’ हे टायटल ट्रॅक प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी या गाण्याचे मेकिंग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ‘आशेच्या भांगेची नशा भारी… घर, बंदूक, बिरयानी…’असे या गाण्याचे बोल आहेत. ए.व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला वैभव देशमुख यांचे बोल लाभले आहेत. तर या जबरदस्त गाण्याला बॉलिवूडचे सुप्रसिद्ध गायक मोहित चौहान यांनी आवाज दिला आहे. या गाण्यात चित्रीकरणादरम्यान संपूर्ण टीमने केलेली धमाल मस्ती दिसत असून कलाकारांनी, चित्रपटाच्या संपूर्ण टीमने पडद्यामागे घेतलेली मेहनतही दिसत आहे. या सगळ्या मेहनतीतूनच या धमाकेदार गाण्याची निर्मिती झाली आहे. चित्रीकरणस्थळ नैसर्गिक वाटावे, यासाठी पडद्यामागच्या कलाकारांनी अनेक आव्हानांना तोंड दिले आहे. पडद्यावर सहज सुंदर दिसणाऱ्या या गाण्याच्या निर्मितीसाठी अनेकांनी घेतलेले श्रम या मेकिंगमधून दिसत आहे. या गाण्याचे गायक मोहित चौहान म्हणतात, ‘’मी पहिल्यांदाच मराठीत असं वेगळं गाणं गात आहे. प्रत्येक गायक हा वेगवेगळ्या भाषेत गात असतो. संगीताला भाषेची मर्यादा नसते. त्यामुळे मराठीत गाण्याचाही मी सुंदर अनुभव घेतला. मी अमराठी असल्याने मला भाषेवर थोडं काम करावं लागलं आणि या सगळ्यात मला संपूर्ण टीमने मदत केली. आतापर्यंत मी नागराज मंजुळे यांचं नाव ऐकून होतो. मात्र या चित्रपटाच्या निमित्ताने आमची भेट झाली आणि आम्ही एकत्र काम केलं. त्यांचा गाण्याच्या अभ्यास, चित्रपटाचा अभ्यास बघून मी थक्क झालो. मराठी सिनेसृष्टीला किती प्रतिभावान टीम लाभली आहे, याचा प्रत्यय आला.’’