NEWS

‘मॅरेथॉन डेस सेबल्स’ स्पर्धेतील पहिले भारतीय असण्याचा महाश्वेता घोष  यांचा दावा खोटा

Share Post

जगातील अत्यंत खडतर म्हणून सहारा वाळवंटातील ‘मॅरेथॉन डेस सेबल्स’ही स्पर्धा ओळखली जाते.  मॅरेथॉन डेस सेबल्स, किंवा MdS, ही सहा दिवसांची, सुमारे २५० कि.मी ची अल्ट्रामॅरेथॉन आहे. या स्पर्धेत काही महिन्यांपूर्वी भारतातील महाश्वेता घोष  या महिलेने सहभाग घेतला होता, त्या नंतर घोष यांनी या स्पर्धेत सहभागी होणारी मी भारतातील पहिली व्यक्ती असल्याचा दावा केला आहे, मात्र या स्पर्धेत २०१० साली सहभागी होणाऱ्या पहिल्या  भारतीय आपण असल्याची माहिती पुण्यातील प्रसिद्ध धावपटू मिशेलअनिल काकडे यांनी आज पत्रकार परिषदेत देत घोष यांचा दावा खोटा असल्याचे सांगितले. 

पुण्यातील धावपटू मिशेल काकडे यांच्या नावावर ६ हजार कि. मी चालण्याच्या  गिनीज बुक रेकॉर्ड सह अन्य विविध विक्रमांची नोंद आहे. 

पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे पत्रकारांशी संवाद साधताना मिशेल काकडे यांनी सांगितले की, ‘मॅरेथॉन डेस सेबल्स’ ही स्पर्धा जगातील सर्वाधिक खडतर स्पर्धेपैकी एक आहे. या स्पर्धेत मी २०१० साली सहभागी झाले होते, त्या पूर्वी स्परक्षेत कोणतीही भारतीय व्यक्ती सहभागी नव्हती, परंतु माझ्या नंतर ९ ते १० भारतीय व्यक्तींनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे. असे असताना महाश्वेता घोष  यांनी आपण पहिल्या भारतीय असल्याचे सांगणे चुकीचे आहे, त्यांनी मीडियासह पंतप्रधान कार्यालयाला सुद्धा चुकीची माहिती देत आपला नावलौकिक वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. यासंदर्भात घोष यांच्याशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधून त्यांना वस्तुस्थिती सांगितली तरीही त्यांनी लोकांची दिशाभूल करणे सुरूच ठेवले आहे. 

पुढे बोलताना मिशेल काकडे म्हणाल्या की, महाश्वेता घोष यांनी ‘मॅरेथॉन डेस सेबल्स’ मध्ये सहभाग घेतला ही बाब भारतीय म्हणून आम्हालाही अभिमानास्पद वाटते, परंतु चुकीची माहिती देऊन जनतेची, मीडियाची आणि सरकारची दिशाभूल करणे, सोशल मीडियावर मेसेज आणि पोस्टच्या माध्यमातून त्यांना पुरावे देऊन चूक दुरुस्त करण्यास सांगितले तर त्यांनी आम्हाला सोशल मीडियावर ब्लॉक केले, पोस्ट डिलिट केल्या आहे. तरी महाश्वेता घोष  यांनी आपला खोटा दावा मागे घेऊन, भारतीयांची दिशाभूल थांबबावी अशी मागणी मिशेल काकडे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *