17/07/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

मुरलीधर मोहोळ यांच्या उमेदवारीच्या समर्थनार्थ मित्रांतर्फे बैठकीचे आयोजन

Share Post

भारतासह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून पुणे शहरातून भाजपचा लोकसभेचा उमेदवार कोण असेल?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जगदीश मुळीक, संजय काकडे, शिवाजी मानकर, सुनिल देवधर अशी मोठमोठी नावे चर्चेत असून त्यांपैकी माजी महापौर मुरलीधर मोहोळ उर्फ अण्णा यांचे नाव स्पर्धेत अग्रस्थानी आहे. कार्यकर्त्यांची मोठी फौज आणि दांडगा जनसंपर्क ही मोहोळांची सर्वात मोठी ताकद आहे. याच अण्णांसाठी त्यांच्या मित्रमंडळींनी ‘तेरी-मेरी यारी, लोकसभेची करू तयारी’, हा अनोखा उपक्रम राबवला आहे.

पुणे शहरात सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. चर्चेत असलेले सर्व भाजपा नेते लोकसभेचे तिकीट मिळवण्यासाठी तयारी करत आहेत. मुरलीधर मोहोळ यांनी देखील लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. अशातच लहानपणापासून एकत्र खाल्लं-पिल्लं, सुख-दु:खात एकमेकांना साथ देत मोठे झालो, आता आपल्या मित्राला आपल्या साथीची आवश्यकता असताना ती नि:स्वार्थपणे देण्यासाठी मुरलीधर मोहोळ यांच्या मित्रांनी पुढाकार घेत बैठकीचे आयोजन करुन अण्णांना निमंत्रित केले.

यावेळी पुणे शहर आणि ग्रामीण भागातून सुमारे दीडशेहून अधिक मित्र जमा झाले. आपला मित्र खासदार झालाच पाहिजे, त्यासाठी काय काय करायचे, कुणी कोणती जबाबदारी पार पाडायची, अशा अनेक विषयांवर चर्चा झाल्या. ज्या मित्रांना प्रत्यक्षात येणे जमले नाही, त्यांनी फोनवर संपर्क साधला. शेवटी सर्वांनी मुरलीधर मोहोळ यांच्यासोबत फोटोसेशन करत जुन्या आठवणींनाही उजाळा दिला.दरम्यान मित्र परिवाराची साथ मिळाल्याने मुरलीधर मोहोळ यांचे पारडे आणखी जड झाले आहे .