मानसी नाईक म्हणतेय ‘लावा फोन चार्जिंगला’
एकविरा म्युझिक प्रस्तुत ‘लावण्यवती’ या अल्बममधील ‘गणराया’ आणि ‘करा ऊस मोठा’ या दोन गाण्यांनंतर आता ‘लावा फोन चार्जिंगला’ ही ठसकेबाज लावणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सर्वांनाच ठेका धरायला लावणाऱ्या ‘लावण्यवती’ च्या गाण्यांमध्ये ‘लावा फ़ोन चार्जिंगला’ या अजून एक ठसकेदार लावणीचा समावेश झाला आहे. नुकताच या लावणीचा टीझर प्रदर्शित झाला असून टीझरवर मिळालेला प्रतिसाद पाहून प्रेक्षक या तिसऱ्या लावणीसाठी उत्सुक होते. ‘लावा फोन चार्जिंग’ला या फक्क्ड लावणीला नवोदित गायिका प्रियांका चौधरीचा जबरदस्त आवाज लाभला आहे. महाराष्ट्राची लाडकी मेनका, जिच्या नृत्य आणि अदाकारीवर अख्खा महाराष्ट्र फिदा आहे त्या मानसी नाईकच्या नखरेल अदाकारीने या लावणीला चारचांद लावले आहेत. गाण्याचे दिग्दर्शन व नृत्य दिग्दर्शन ‘सुंदरीकार’ आशिष पाटील यांचे असून ‘रॉकस्टार’ अवधूत गुप्तेंचे शब्द आणि स्वररचना आहे. या सर्वांच्या कलेने ही ‘लावण्यवती’ बहरली आहे.
‘लावण्यवती’ अल्बमबद्दल अवधूत गुप्ते म्हणतात, “ ‘लावण्यवती’तील पहिल्या दोन लावण्या संगीतप्रेमींच्या पसंतीस उतरल्या. आता ही तिसरी बहारदार लावणी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. मानसी नाईकने आपल्या नजाकतीने तिच्या चाहत्यांना घायाळ केले आहे. आता या लावणीने तिच्या चाहत्यांमध्ये अधिकच भर पडणार आहे. खूप धमाकेदार अशी ही लावणी आहे.”