‘मानसरंग नाट्यमहोत्सव’ घेऊन येणार तीन नवी नाटके!
‘परिवर्तन, सातारा’ या संस्थेमार्फत देण्यात आलेल्या ‘मानसरंग नाट्य-शिष्यवृत्ती’ अंतर्गत नव्याने बसवलेल्या तीन नाटकांचा ‘मानसरंग नाट्यमहोत्सव’ हा मराठी रंगभूमी दिनी ५ नोव्हेंबरला पुणे येथील ‘द बॉक्स’ ह्या रंगमंचावर सादर केला जाणार आहे. नवीन पिढीचे दिग्दर्शक सचिन शिंदे, अभिजित झुंजारराव आणि क्षितीश दाते यांनी बसवलेली मानसिक आरोग्य या विषयाला विविध अंगानी भिडण्याचा प्रयत्न करणारी ही तीन नाटके असल्याची माहिती ‘मानसरंग’ चे अतुल पेठे, डॉ हमीद दाभोलकर आणि राजू इनामदार यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
पत्रकार परिषदे मध्ये बोलताना अतुल पेठे म्हणाले की, ‘परिवर्तन’ संस्थेमार्फत गेली पाच वर्षे मानसिक आरोग्याच्या प्रश्नांवर कला अभिव्यक्तीच्या माध्यमातून उपचार आणि प्रबोधन करण्यासाठी ‘मानसरंग’ नावाचा मंच चालवला जातो. ह्या ‘मानसरंग’ मंचाचा एक कार्यक्रम म्हणून या वर्षीपासून मानसिक आरोग्याच्या प्रश्नावर नाटकाच्या माध्यमातून भाष्य आणि जनजागृती करण्यासाठी मानसरंग नाट्य-शिष्यवृत्ती देण्यात आली होती. पहिल्या नाट्य-शिष्यवृत्तीसाठी निवडलेले तिनही नवीन पिढीचे दिग्दर्शक असून ह्या नाट्य शिष्यवृत्तीच्या माध्यमातून त्यांनी मानसिक आरोग्याच्याविषयी भाष्य करणारी नाट्यानुभव देणारी नाटके तयार केली आहेत.
निवड झालेल्या नाट्य दिग्दर्शक आणि त्यांच्या गटासाठी ‘परिवर्तन’ संस्थेमार्फत मानसिक आरोग्य या विषयी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या मध्ये मानवी मन, मनाचे व्यवहार आणि आजार तसेच त्यांचे उपचार या विषयी शास्त्रीय माहितीची नातूकर्मींना माहिती देण्यात आली. डॉ मोहन आगाशे , डॉ.अंजली जोशी, डॉ. चंद्रशेखर फणसळकर, डॉ. हमीद दाभोलकर यांनी या प्रकल्पात मार्गदर्शन केले. तसेच श्री. राजीव नाईक यांचे विशेष सहकार्य या एकूण प्रक्रियेत मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की, तीन वर्षात प्रत्येकी तीन अशी एकूण नऊ नव्या पिढीच्या दिग्दर्शकांची नऊ नाटके या प्रकल्पाच्या अंतर्गत निर्माण होणार आहेत. ही मराठी रंगभूमीच्या नव्या वाटा शोधण्यात उपयुक्त होतील.
‘मानसरंग नाट्यमोहोत्सवा’त ‘सोशल नेट्वर्किंग फोरम’ आणि सपान नाशिक निर्मित सचिन शिंदे दिग्दर्शित केलेले दत्ता पाटील लिखित ‘तो राजहंस एक’, ‘अभिनय, कल्याण’ निर्मित आणि अभिजित झुंजारराव दिग्दर्शित श्रीपाद देशपांडे लिखित ‘रंगीत संगीत गोंधळ’ आणि ‘थिएट्रॉन एन्टरटेनमेन्ट’ निर्मित ओंकार गोखले लिखित आणि क्षितीश दाते दिग्दर्शित ‘न केलेल्या नोंदी’ ही तीन नाटके सदर केली जाणार आहेत
पत्रकार परिषदे मध्ये पुढे बोलताना डॉ. हमीद दाभोलकर यांनी असे सांगितले की, मानसिक आरोग्याचा प्रश्न हा सध्याच्या कालखंडात एक महत्वाचा प्रश्न म्हणून समोर येत आहे. करोना नंतरच्या कालखंडात त्याचे गांभीर्य अधिक वाढले आहे. अजूनदेखील आपल्या समाजात मानसिक आजारांच्या विषयी पुरेशी माहिती नाही. मानसिक आजारांच्याकडे कलंकाच्या नजरेतून बघितले जाते. पालकत्व, पती-पत्नी मधील ताण-तणाव, कामाच्या ठिकाणचे ताण, मोबाईलचा वाढता वापर असा एक मोठा मानसिक आरोग्य आणि आजार यांचा पट आपल्या समोर आहे. या प्रश्नांना नाटकाच्या माध्यमातून भिडण्याचा ‘मानसरंग नाट्य-शिष्यवृत्ती’ आणि ‘नाट्य-महोत्सव’ हा प्रयत्न आहे. ‘मानसरंग नाट्य महोत्सवा’तील नाटकांच्या सादरीकरणा नंतर त्या विषयी तज्ज्ञांच्या उपस्थितीत चर्चा केली जाणार आहे. ह्या नाटकांचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांच्या मध्ये प्रयोग आयोजित करून त्यांच्या अनुषंगाने मानसिक आरोग्याविषयी चर्चा आणि प्रबोधन केले जाणार आहे असे देखील त्यांनी नमूद केले. बजाज ऑटो ह्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून याला आर्थिक मदत मिळाली असल्याचे देखील त्यांनी नमूद केले. ‘मानसरंग’चे समन्वयक राजू इनामदार आणि रेश्मा कचरे ह्या वेळी उपस्थित होते.