23/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना जाधवर इन्स्टिटयूटतर्फे जीवनगौरव पुरस्कार

Share Post

शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य संस्था असलेल्या न-हे मानाजीनगर येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूट च्या ९ व्या वर्धापनदिनानिमित्त सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचा जीवनगौरव पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना शनिवार, दिनांक २८ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल, मानाजीनगर, न-हे येथे होणा-या कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सन्मान सोहळ्यात कष्टक-यांचे नेते डॉ.बाबा आढाव यांना सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार, शिक्षण प्रसारक मंडळी नियामक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड.एस.के.जैन यांना शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार, उद्योग क्षेत्रातील पुरस्कार रांका ज्वेलर्सचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, बँकिंग क्षेत्रातील पुरस्कार विद्याधर अनास्कर आणि ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांना पत्रकारिता क्षेत्रातील पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्कारांचे स्वरुप आहे. कार्यक्रमात प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकाचे प्रकाशनही होणार आहे.

अ‍ॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, दरवर्षी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तिंना पुरस्काराने गौरविण्यात येते. यावर्षी कार्यक्रमाला राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे हे अध्यक्षस्थानी असणार आहेत. तसेच माजी मंत्री उल्हास पवार, महादेव जानकर, सदाभाऊ खोत, संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ.सुधाकरराव जाधवर यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात संस्थेच्या कै.उद्धवराव तुळशीराम जाधवर एज्युकेशनल कॅम्पस, धायरी पुणे ४१ या नवीन कॅम्पसचे भूमीपूजन देखील होणार आहे.

जाधवर परिवारात असलेल्या पंचवीस हजार विद्यार्थी व पालक आणि दीड हजारपेक्षा जास्त कर्मचा-यांना प्रेरणा मिळावी, याउद्देशाने सन्मान सोहळ्याचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण देत त्यांना समाजातील प्रेरणादायी व्यक्तींचे मार्गदर्शन मिळावे, यादृष्टीने विविध उपक्रमांच्या माध्यमातून संस्थेचे प्रयत्न सुरु असतात.