“महिला सन्मान बचत पत्र विशेष मोहीम” व “महादेव कोळी” जमातीवर भारतीय डाक विभाग, पुणे रिजन द्वारे विशेष आवरणचे अनावरण
पुणे शहर टपाल विभागा तर्फे “महिला सन्मान बचत पत्र” (MSSC) चे खाते उघडण्याच्या मोहिमेत विशेष कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमात “महिला सन्मान बचत पत्र विशेष मोहीम” आणि “महादेव कोळी” जमाती वरती भारतीय डाक विभाग,पुणे रिजन द्वारे विशेष आवरण (Special Cover) चे अनावरण मा.श्री. रामचंद्र जायभाये, पोस्ट मास्तर जनरल,पुणे रिजन, पुणे यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन मा.श्री.प्रकाश जावडेकर, खासदार (राज्यसभा), श्रीमती.माधुरी मिसाळ, मा.आमदार, पर्वती मतदारसंघ, पुणे, श्री. संग्राम गायकवाड, आयकर आयुक्त, पुणे, आणि श्रीमती सिमरन कौर, निदेशिका डाक सेवा , पुणे रिजन उपस्थित होते.
देशातील महिलांची आर्थिक समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी, भारत सरकारने 1 एप्रिल 2023 पासून “महिला सन्मान बचत पत्र” योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत पुणे पोस्टल रिजनने दिनांक 01.04.2023 ते 30.06.2023 या अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये 31,615 “महिला सन्मान बचत पत्र” खाती उघडली आहेत.ज्याची गुंतवणूक सुमारे 237 कोटी रु. पेक्षा जास्त आहे. पुणे शहर पूर्व विभागाने “महिला सन्मान बचत पत्र” खाते उघडण्यासाठी दिनांक 23.06.2023 ते 26.06.2023 पर्यंत तीन दिवसांची विशेष मोहीम राबविली. या मोहिमेत तब्बल 10,430 खाती उघडली आहेत, ज्यांची गुंतवणूक रक्कम ३९ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
या प्रसंगी बोलतांना मा.श्री.प्रकाश जावडेकर, खासदार (राज्यसभा) यांनी भारतीय टपाल विभागाच्या कामगिरीचे कौतुक केले. "महादेव कोळी" जमाती वरती विशेष आवरण काढून टपाल विभागाने आदिवासी समाज बांधवांना एका वेगळ्या प्रकारे सन्मानित केल्याचे नमूद केले. टपाल विभागाच्या पुणे पोस्टल रिजनने अल्पावधीत हजारोंच्या संखेने महिलांची "महिला सन्मान बचत पत्र" खाते उघडून एक प्रकारे या सर्व महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविण्याचे काम केल्याचे नमूद केले. "महिला सन्मान बचत पत्र" म्हणजे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली सुरु केलेली ही विशेष योजना असून सदर योजना हजारो महिलांपर्यंत पोहचविण्याचे काम भारतीय टपाल विभाग करीत असल्याचे नमूद केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
श्रीमती.माधुरी मिसाळ, मा.आमदार, पर्वती मतदारसंघ, पुणे आणि श्री. संग्राम गायकवाड, आयकर आयुक्त, पुणे यांनी देखील पुणे पोस्टल रिजनच्या विशेष कामगिरीचे कौतुक केले. मा.श्री. रामचंद्र जायभाये, पोस्ट मास्तर जनरल,पुणे रिजन यांनी टपाल विभागाच्या विशेष टपाल आवरणाचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्व सांगितले. तसेच टपाल विभागाच्या अनेक विविध योजनांनवर त्यांनी दृष्टीक्षेप टाकला व आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात भारतीय टपाल विभागाचे योगदान अधोरेखित केले. श्रीमती सिमरन कौर, निदेशिका डाक सेवा , पुणे रिजन यांनी विशेष कामगिरी केलेल्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले व जास्तीत जास्त महिलांना “महिला सन्मान बचत पत्र” योजनेत सहभागी करून घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.अभिजीत इचके,मा. प्रवर अधीक्षक डाकघर, पुणे पूर्व विभाग यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती रिप्पन डूलेट, मा. प्रवर अधीक्षक डाकघर, पुणे पश्चिम विभाग यांनी केले.