महा एनजीओ फेडरेशनतर्फे महाराष्ट्रात ६७ ठिकाणी रक्तदान महाचळवळ
आर्ट ऑफ लिविंग चे प्रणेते श्रीश्री रविशंकर गुरुदेव यांच्या ६७ व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातल्या ६७ ठिकाणी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून महा एनजीओ फेडरेशनच्या वतीने रक्तदान महाचळवळ राबविण्यात आली. पुण्यासह छत्रपती संभाजीनगर, बीड, बुलडाणा, धाराशिव, धुळे, जळगाव, जालना, नागपूर, नाशिक, परभणी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर,वाशीम, अहमदनगर, नंदुरबार, नांदेड, सांगली आदी शहरे व जिल्ह्यांमधून १५०० होऊन अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले.
महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा यांच्या संकल्पनेतून हा महायज्ञ पार पडला. यावेळी अभय छाजेड, महा एनजीओ फेडरेशनचे कार्यकारी संचालक अक्षयमहाराज भोसले, ज्येष्ठ संचालक मुकुंद शिंदे, राहुल जगताप, कैलास सिकची, दर्शन मुंदडा, अमोल पवार आदी उपस्थित होते.
पुण्यामध्ये महर्षी नगर, शिरूर, कोरेगाव, इंदापूर, पुरंदर, आंबेगाव, कात्रज, कोथरुड, देहू रोड यांसह शहरी भागात देखील शिबीरे झाली. पुण्यामध्ये आधार ब्लड बँक, ससून सर्वोच्च रुग्णालय रक्त केंद्र, जनकल्याण रक्त पेढी आदिंनी शिबीराच्या संयोजनात सहभाग घेतला.
शेखर मुंदडा म्हणाले, रक्तदान म्हणजे आपले निरोगी रक्त गरजू व्यक्तींसाठी दान करण्याची कृती आहे. जे नागरिक आपली जात-पंथ- धर्म आणि इतर गोष्टींचा विचार न करता रक्तदान करतात, त्यांनी ख-या अर्थाने मानवता जागृत ठेवली आहे. अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणारे रविशंकर यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आयोजित रक्तदान शिबिराला महाराष्ट्रात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला श्रीश्री रवीशंकर यांचा वाढदिवस रक्तदानाची मोठी मोहीम व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहेत. महाराष्ट्रभर मिळालेला रक्तदानाचा उत्तुंग प्रतिसाद पाहत श्रीश्रींचा वाढदिवस रक्तदानाची चळवळ होत आहे, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
फोटो ओळ : आर्ट ऑफ लिविंग चे प्रणेते श्रीश्री रविशंकर गुरुदेव यांच्या ६७ व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातल्या ६७ ठिकाणी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून महा एनजीओ फेडरेशनच्या वतीने रक्तदान महाचळवळ राबविण्यात आली. महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा यांच्या संकल्पनेतून हा महायज्ञ पार पडला. शिबीरात सहभागी रक्तदाते.