महालक्ष्मी देवीच्या साक्षीने पार पडला बाईपण भारी देवा चित्रपटाच्या शीर्षक गीताचा लाँच सोहळा
जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचं टायटल सॉंग मुंबईतील श्री महालक्ष्मी मंदिरात मान्यवरांच्या उपस्थितीत लॉंच करण्यात आलं. या गाण्याच्या लॉंचिंग सोहळ्याला दिग्दर्शक केदार शिंदे,अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, दीपा परब, शिल्पा नवलकर आणि संगीतकार साई-पियुष उपस्थित होते. ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटातील या शीर्षक गीतावर रिलीज आधीच लोकांनी ठेका धरलेला पहायला मिळाला आहे. सोशल मीडियावर तर सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत साऱ्यांनीच या गाण्याच्या चालीवर रील्सद्वारे ठेका धरायला सुरूवात केली आहे. त्यामुळे निश्चितच या गाण्याविषयीची उत्सुकता लोकांमध्ये असणार हे वेगळं सांगायला नको.
जिओ स्टुडियोजचा ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट प्रत्येक स्त्रीला आता स्वतःसाठी देखील जगायला शिकवणार हे नक्की.. तेव्हा आता तयार रहा.. केदार शिंदेंचा स्पेशल टच असलेला, सहा गुणी अभिनेत्रींनी चित्रपटात उडवलेली धमाल, अनुभवायला!
जिओ स्टुडिओज प्रस्तुत, माधुरी भोसले आणि जिओ स्टुडिओज निर्मित, बेला शिंदे-अजित भुरे सह-निर्मित आणि केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट आपल्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. सिनेमाचं नाव जसं भारी भरकम आहे तशीच सिनेमातील स्टारकास्टही तगडी आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून रोहिणी हट्टंगडी,वंदना गुप्ते,सुकन्या मोने,शिल्पा नवलकर,सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब अश्या मातब्बर अभिनेत्री एकत्र पडद्यावर पाहण्याचा आनंद प्रेक्षकांना घेता येणार आहे. ‘बाईपण भारी देवा’ आता प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला असून ३० जून,२०२३ रोजी चित्रपटगृहात आपल्या भेटीस येत आहे