महाराष्ट्र पर्यटनाद्वारे राज्यातील पर्यटन आणि व्यवसाय संधी वाढविणाऱ्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे उद्घाटन
राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी कटिबध्द असलेल्या पर्यटन संचालनालयाने महाराष्ट्रातील पर्यटन आणि व्यवसायाच्या संधी वाढविण्याच्या आपल्या महत्त्वाकांक्षी योजनेची आज घोषणा केली. या प्रदेशाची प्रचंड क्षमता ओळखून, राज्यातील पर्यटन व व्यवसाय सहकार्यांना चालना देताना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आपल्या अद्वितीय सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक संपत्तीचा लाभ घेण्याचे महाराष्ट्र पर्यटनाचे उद्दिष्ट आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, पर्यटन संचालनालयाने पुण्यामध्ये दुसरे देशांतर्गत कॉन्क्लेव्ह आयोजित केले होते. हा कार्यक्रम 7 जुलै 2023 रोजी शहरातील प्रसिद्ध हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला होता. यात शहरातील पर्यटन क्षेत्राशी निगडीत नामांकीत सहल आयोजक, आणि शहरातील आणि आसपासच्या साहसी आणि कृषी पर्यटन युनिट्ससह प्रवासी व्यवसायिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
वैविध्यपूर्ण आणि रमणीय भूप्रदेश, अद्वितीय शहरे आणि समृद्ध वारसा यासह, महाराष्ट्र हे नियमित पर्यटक आणि नाविन्याचा शोध घेणारे प्रवासी या दोघांसाठी दीर्घकाळापासून पसंतीचे ठिकाण आहे. मुंबईचे गजबजलेले महानगर, लोणावळा आणि महाबळेश्वर हे आकर्षक हिल स्टेशन्स, प्राचीन अजिंठा आणि एलोरा लेणी आणि अलिबाग, आंजर्ले, गुहागर, आरे-वारे, मिठाबाव, तारकर्ली, इ. समुद्रकिनारे यासारख्या प्रसिध्द ठिकाणे राज्यात आहेत. महाराष्ट्राचे अलौकीक सौंदर्य आणि सांस्कृतिक समृद्धीचे प्रदर्शन करून, पर्यटन विभागाने राज्याला जगभरातील पर्यटकांसाठी एक आदर्श पर्यटन स्थळ म्हणून स्थान देण्याचा मानस आहे.
महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या दूरदृष्टीच्या अनुषंगाने, पर्यटन विभागाने पर्यटन आणि व्यापार क्षेत्राला चालना देण्यासाठी सर्वसमावेशक धोरण राबविण्याची योजना आखली आहे. या धोरणामध्ये नवीन पर्यटन सर्किट्सचा विकास, विद्यमान पायाभूत सुविधांची वाढ आणि शाश्वत पर्यटन पद्धतींचा प्रचार यांचा समावेश आहे. याशिवाय, महाराष्ट्र पर्यटनचे उद्दिष्ट ट्रॅव्हल एजन्सी, टूर ऑपरेटर आणि स्थानिक समुदायांसह विविध भागधारकांसह, अभ्यागतांसाठी अविस्मरणीय अनुभव निर्माण करण्यासाठी आणि क्षेत्राची आर्थिक वाढ आणि सक्षमीकरण सुनिश्चित करण्यासाठी आहे.