महाराष्ट्रात विद्यापीठ खुल्या निवडणुका पुन्हा सुरू कराव्यात- याज्ञवल्क्य शुक्ल (राष्ट्रीय महामंत्री, अभाविप)
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री याज्ञवल्क्य शुक्ल दिनांक १७ मार्च २०२३ ला पुणे शहरात प्रवासासाठी आले. यावेळी, भारतातील विद्यमान शैक्षणिक सद्यस्थिती या विषयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. नवीन शैक्षणिक धोरण याचे क्रियान्वयन संपूर्ण भारतात लवकरात लवकर व्हावे, केंद्रीय विश्वविद्यालय आणि महाविद्यालयांच्या पाठ्यक्रमांमध्ये आवश्यक असणारा योग्य तो बदलाव करण्यात यावा अशी अपेक्षा त्यांनी या पत्रकार परिषदेत व्यक्त केली. त्याचसोबत, भारतातील युवा सक्षमीकरण आणि रोजगार उपलब्धतेसाठी महाविद्यालयात “प्लेसमेंट, नवीनता, स्टार्टअप सेंटर” उभे करावे अशी मागणी देखील त्यांनी याठिकाणी केली. एनटीए (NTA) बद्दल बोलताना ते म्हणाले की “नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेतल्या जाणार्या प्रवेश परीक्षा आणि इतर परीक्षांना जीएसटी करमुक्त करण्याचा जीएसटी परिषदेचा निर्णय स्वागतार्ह आहे. यापूर्वी 8 टक्के जीएसटी कर लावल्याने शुल्कात आणखी वाढ झाली असती.” या संदर्भात अभाविपनेही जीएसटी करातून सूट देण्याची मागणी केली होती.विविध परीक्षा आणि नोकऱ्यांचे शुल्क विद्यार्थ्यांच्या आर्थिक सोयीनुसार असावे असे मत त्यांनी व्यक्त केले. संपूर्ण देशभरात पेपर फुटीचा प्रकार वाढत्या प्रमाणात दिसून येत आहे. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात असा भ्रष्टाचार लाजिरवाणा आहे. यावर आळा बसवण्यासाठी प्रत्येक राज्याने आपल्या राज्यपातळीवर योजना करावी. एक समिती गठीत करून या प्रकरणात कायदेशीर कारवाई करण्यात यावी, व आरोपींना योग्य ती शिक्षा द्यावी. विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटना समोर येत आहेत. आजचे विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. अशा आत्महत्या होत राहिल्या तर देशाचे भविष्य धोक्यात येईल. सरकारने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे व याचे कारण जाणून घेऊन यावर लवकरच काही तोडगा काढला पाहिजे. प्रत्येक महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन केंद्र उभे केले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. वैद्यकीय क्षेत्रात आजच्या तारखेला एमबीबीएस च्या १ लाखाहून अधिक जागा वाढल्या आहेत. भारताच्या इतिहासात ही सर्वात आनंदाची बाब आहे. यामुळे, भारताच्या वैद्यकीय क्षेत्राला अजूनच आधार भेटेल. वैद्यकीय शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना भारता बाहेर जाण्याची गरज पडणार नाही. ते भारतातच शिक्षण घेऊ शकतील. महाराष्ट्रात देखील एमबीबीएस साठी १४ नविन वैद्यकीय महाविद्यालयांची घोषणा राज्य सरकारने केली. अभाविप या निर्णयाचे स्वागत करते. यामुळे, महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्रात चांगलाच फायदा होईल. *महाराष्ट्रातील शैक्षणिक सद्यस्थिती वर बोलताना “विद्यापीठ खुल्या निवडणुका पुन्हा सुरू कराव्यात” अशी मागणी त्यांनी महाराष्ट्र राज्य सरकार कडे केली.* अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ७५ वे वर्ष सुरू आहे. अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून अभाविप ने संपूर्ण देशभरात जिल्हा स्तरीय विद्यार्थी संमेलन करण्याचे ठरवले. आतापर्यंत ५०९ जिल्ह्यातून ४३४२ स्थानी हे जिल्हा संमेलन झाली. या संमेलनात ५९६० महाविद्यालयांतून एकूण ६४२५६७ विद्यार्थी उपस्थित होते. यात ३४७६२४ विद्यार्थी, २५१५२२ विद्यार्थीनी , ११८९९ प्राध्यापक व ३१५२२ अन्य असे सदस्य उपस्थित होते अशी माहिती त्यांनी दिली.यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे, पुणे महानगर मंत्री शुभंकर बाचल उपस्थित होते.