EntertainmentNEWS

‘महापरिनिर्वाण’ दिनानिमित्ताने ‘महापरिनिर्वाण’ चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला

Share Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण हे संपूर्ण भारतासाठी प्रचंड शोकाचे होते. त्यांच्या निधनाने लाखों लोकांच्या हृदयात एक पोकळी निर्माण झाली. लाखों लोकांच्या भावनांना ओघ आला, त्यांनी शोक व्यक्त केला, प्रार्थना सभा घेतल्या आणि श्रद्धांजली वाहिली. आज ६ डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने, ‘महापरिनिर्वाण’ चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये बाबासाहेबांच्या अंतयात्रेतील लाखों लोकांची गर्दी दिसत आहे, जी त्यांच्या शक्तिशाली कथाकथनाने मार्मिकपणे प्रेक्षकांना मोहित करत आहे. “माणूस मेल्यावर त्याची राख होते, आपण राख विसर्जित करतो, पण मला त्या राखेच्या दिव्य आणि तेजस्वी कणातूनच इतिहास घडवायचाय.” असे म्हणत अभिनेता प्रसाद ओक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनी घडलेल्या गुंतागुंतीच्या भावना व घटनांचा उलगडा करणाऱ्या श्री नामदेवराव व्हटकर यांची भूमिका साकारली आहे. त्यांच्यासोबत अभिनेता गौरव मोरेही दिसत आहे. मात्र त्याची नेमकी भूमिका काय आहे, हे चित्रपट आल्यावरच कळेल. याव्यतिरिक्त या चित्रपटात डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका कोण साकारणार? हेसुद्धा अद्याप गुलदस्त्यात आहे.

भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये उल्लेखनीय योगदान असलेला, दलितांच्या हक्कांसाठी लढलेला, समाजाच्या विविध क्षेत्रातील लोकांची जात, धर्माचा विचार न करता, सामाजिक न्याय आणि समतेसाठी लढणारा दूरदर्शी नेता आणि समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनानंतर लाखों लोकांनी शोक व्यक्त केला होता. ‘महापरिनिर्वाण’ हा चित्रपट या ऐतिहासिक प्रसंगाचा समाजावर व त्या व्यक्तीच्या जीवनावर झालेल्या खोल परिणामांवर प्रकाश टाकणारा आहे. या चित्रपटाद्वारे प्रसाद ओक, गौरव मोरे, अंजली पाटील, कमलेश सावंत, दीपक करंजीकर, प्रफ्फुल सावंत , विजय निकम , हेमल इंगळे, कुणाल मेश्राम यासारखे नामवंत कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *