महात्मा ज्योतिराव – क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले चा संघर्ष मोठ्या पडद्यावर, ‘सत्यशोधक’ चित्रपटाचा टिझर रिलीज
आज समाजातील महिला वेगवेगळ्या उच्च पदांवर बेधडकपणे काम करतात. याचं सर्व श्रेय क्रांतीज्योती ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाई यांनाच जातं. त्यांच्या जीवनावर आधारित ‘सत्यशोधक’ या चित्रपटाचे टिझर लॉन्च आज (ता. २४) खा. शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या चित्रपटात ज्योतिरावांच्या प्रमुख भूमिकेत संदीप कुलकर्णी दिसतील.
संभाजी ब्रिगेड-भारत मुक्ती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सत्यशोधक समाज स्थापनेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ‘सत्यशोधक संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्ताने संमेलनात ‘सत्यशोधक’ या चित्रपटाचे टिझर लॉन्च करण्यात आले. या संमलेनाचे उद्घाटक खा. शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते हा टिझर लॉन्च करण्यात आला. ‘विद्येविना मती गेली, मतिविना निती गेली…’ अशा कठोर शब्दांत शिक्षणाचे महत्त्व सांगणाऱ्या ज्योतिरावांच्या आयुष्यातील संघर्ष आता मोठ्या पडद्यावर साकारणार आहे. येत्या दिवाळीत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येईल. अभिनेते संदीप कुलकर्णींसह राजश्री देशपांडे, गणेश यादव, सुरेश विश्वकर्मा, रविंद्र मंकणी ही कलाकार मंडळी चित्रपटात झळकतील. या टिझर लॉन्च सोहळ्याला वामन मेश्राम, प्रवीण गायकवाड, बाबा आढाव, मा. म. देशमुख, आ. रोहित पवार, व्ही. व्ही. जाधव, अॅड. वासंतीताई नलावडे, विठ्ठलदादा सातव, डॉ. जे. के. पवार उपस्थित होते.
समता फिल्म्स प्रस्तुत आणि निलेश जळमकर लिखित-दिग्दर्शित सत्यशोधक चित्रपटाचे निर्माते प्रविण तायडे, आप्पा बोराटे, भिमराव पट्टेबहादूर, सुनील शेळके, विशाल वाहूर वाघ हे आहेत, तर सहनिर्माते राहुल वानखडे, बाळासाहेब बांगर, हर्षा तायडे,प्रतिका बनसोडे आणि प्रमोद काळे हे आहेत. महेश भारंबे, शिवा बागुल हे कार्यकारी निर्माते आहेत. ‘सत्यशोधक’ हा चित्रपट आगामी दिवाळीत आपल्या भेटीस येईल.