मल्टीस्टारर धमाल कॉमेडी “सासूबाई जोरात’२६ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात
सासू-सुनेचं नातं विळ्याभोपळ्यासारखं असतं. पण सासू आणि जावयाच्या धमाल नात्याचं चित्रण सासूबाई जोरात या चित्रपटात करण्यात आलं आहे. सिद्धार्थ प्रभाकर ढगे यांनी लेखन-दिग्दर्शन केलेला आणि दमदार स्टारकास्ट असलेला हा चित्रपट २६ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
प्रभू शांती फिल्म प्रॉडक्शननं “सासूबाई जोरात” हा चित्रपट प्रस्तुत केला आहे. सिद्धार्थ प्रभाकर ढगे यांनी या चित्रपटाच्या लेखन, दिग्दर्शन, गीतलेखन आणि निर्मितीची धुरा सांभाळली आहे. तर तेजस काळोखे यांनी संगीत, कुमार डोंगरे यांनी छायांकन केलं आहे. चित्रपटात सयाजी शिंदे, संदीप पाठक, विजय पाटकर, मोहन जोशी, सुनील गोडबोले, उषा नाईक, आशा बिराजदार, विधी कुडिया, सिमरन क्षीरसागर, मिलिंद ढगे, सुयश लातूरे आदींच्या प्रमुख भूमिका आहेत.
“सासुबाई जोरात” ही गोष्ट आहे आधुनिक सासू आणि तिच्या आधुनिक जावयाची. या सासूला तिच्या नवऱ्याचीही चिंता नाही. त्याशिवाय ती जावयाशीही अत्यंत कठोरपणे वागते. या सासू आणि जावई यांच्यात काय होतं याची धमाल गोष्ट सासूबाई जोरात या चित्रपटात मांडण्यात आली आहे. त्यामुळे सासू-सुनेच्या अनेक प्रकारच्या लढाया आजवर चित्रपट मालिकांतून पाहिल्यानंतर आता सासु-जावयाची धमाल गोष्ट चित्रपटात पाहणं हा मनोरंजक अनुभव ठरेल यात शंकाच नाही. त्याशिवाय चित्रपटात उत्तम स्टारकास्ट असल्यानं हा चित्रपट अभिनयाची मेजवानीच ठरेल.