मराठ्यांच्या स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा लढा दाखवणार ‘बलोच’
मराठ्यांच्या स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा लढा दाखवणाऱ्या ‘बलोच’ या चित्रपटाचे रोमांचक टिझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. विश्वगुंज पिक्चर्स आणि कीर्ती वराडकर प्रस्तुत या चित्रपटाचे प्रकाश जनार्दन पवार दिग्दर्शक आहेत. यात प्रवीण विठ्ठल तरडे आणि अशोक समर्थ प्रमुख भूमिकेत आहेत. प्रकाश जनार्दन पवार यांची कथा आणि पटकथा असलेल्या या चित्रपटाते दत्ता काळे (डी के), जितेश मोरे, संतोष बळी भोंगळे, नेमाराम चौधरी, बबलू झेंडे, गणेश खरपुडे, ज्ञानेश गायकवाड चित्रपटाचे निर्माते आहेत. तर पल्लवी विठ्ठल बंडगर, सुधीर वाघोले, विजय अल्दार सहनिर्माते आहेत.
टिझरमध्ये चित्रपटाची भव्यता दिसत असून अंगावर शहारे आणणारा हा टिझर आहे. प्रवीण तरडे यांचे मनाला भिडणारे संवाद, मराठ्यांचे साम्राज्य टिकवण्यासाठीची तगमग दिसतेय. पानिपतच्या लढाईत पराभव झाल्यानंतर बलुचिस्तानातील गुलामगिरीत होरपळणाऱ्या मराठ्यांची व्यथा सांगणारा आणि तिथल्या भयाण वास्तवाचे दर्शन घडवणारा ‘बलोच’ चित्रपट येत्या ५ मे रोजी प्रदर्शित होत आहे.
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक प्रकाश जनार्दन पवार म्हणतात, ”पानिपतचा पराभव हा मराठ्यांच्या दृष्टीने मानहानी करणारा असला तरी मराठ्यांचे सळसळते रक्त त्यांना शांत बसू देत नव्हते. अन्यायाला, अत्याचाराला सोमोरे जात त्यांनी शत्रुला चोख उत्तर दिले. मराठ्यांची हीच विजयगाथा मी पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न केला आहे .”