29/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

मराठी विनोद परंपरा क्षीण होत आहे – ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले

Share Post

मराठी भाषेचे ज्ञान, निरीक्षण शक्ती आणि भाषेविषयीची तळमळ या गोष्टी बदलत्या काळानुसार सर्वसामान्यांमध्येही कमी होत आहे. त्याचा परिणाम म्हणून मराठी भाषेतील विनोद परंपरा जी एकेकाळी अत्यंत समृद्ध होती, ती आता क्षीण होत आहे, अशी खंत ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांनी व्यक्त केली.

पुणे नगर वाचन मंदिर संस्थेतर्फे आचार्य प्र. के. अत्रे यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त ‘मराठी विनोदाची परंपरा’ या विषयावर मंगला गोडबोले यांच्या व्याख्यानाचे आयोजन संस्थेच्या सभागृहात करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंगला गोडबोले आणि संस्थेचे उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख यांच्या हस्ते आचार्य अत्रे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

मंगला गोडबोले म्हणाल्या, प्र.के. अत्रे, पु. ल. देशपांडे, राम गणेश गडकरी यांच्यासारख्या प्रतिभावान लेखकांमुळे मराठी भाषेतील विनोद हा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला. हा विनोद अधिकाधिक समृद्ध होत गेला. यामध्ये मुख्यतः सर्वसामान्यांचे दुःख आणि त्यांचे प्रश्न मांडण्याची तळमळ दिसत होती. ही परंपरा दृकश्राव्य माध्यमांचे आक्रमण आणि सामाजिक जाणीव कमी झाल्यामुळे क्षीण होत आहे.

त्या पुढे म्हणाल्या, प्र. के. अत्रे यांनी सामाजिक जाणीव आणि समस्या याबद्दल आपले मत मांडताना कधीही भीती बाळगली नाही. परंतु आज मात्र सामाजिक परिस्थिती बदलल्यामुळे कोणताही लेखक देव, धर्म आणि परंपरेविषयी बिनधास्तपणे लिहू शकत नाही. कारण कुठून कोणत्या समाजाचा मोर्चा येईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे एक प्रकारे लेखकांवर आणि त्यांच्या साहित्य परंपरेवर समाजाचे नियंत्रण दिसून येते. अशा काळामध्ये विनोदाला मर्यादा येतात.

पूर्वी मराठी लेखक सर्वसामान्यांच्या प्रश्न आणि समस्या संदर्भातही भूमिका घेत होते. त्याचे पडसाद त्यांच्या लेखनातही दिसून येत. विनोदी अंगाने ते सामाजिक प्रश्न मांडत होते. त्यामधून त्यांची तळमळ दिसून येत होती. आज मात्र समाज विनोदाचा खुल्या मनाने स्वीकार करत नाही. कोणता तरी समाजगट नाराज होईल, या भीतीने लेखक पूर्णतः व्यक्त होऊ शकत नाही, याचाच परिणाम विनोदाची परंपरा क्षीण होण्यातही झाला आहे, असेही मंगला गोडबोले यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवींद्र चौधरी यांनी केले. संस्था परिचय प्रसाद जोशी यांनी केला. तर, प्रमुख पाहुण्यांची ओळख व सूत्रसंचालन संगीता पुराणिक यांनी केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने श्रोते व संस्थेचे सदस्य अरविंद रानडे, विनायक माने, गायत्री सावंत, दीपक पाथरकर, संकेत देशपांडे आदी उपस्थित होते.