‘मंगळागौरी क्वीन्स स्पर्धा २०२३’ थाटात संपन्न
जनकल्याण बहुउद्देशीय फाउंडेशन,पुणे या संस्थेच्या वतीने ‘मंगळागौरी क्वीन्स स्पर्धा २०२३’ या मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अण्णा भाऊ साठे सभागृह, पद्मावती येथे सायंकाळी ४ ते सायंकाळी ८ या दरम्यान ही रंगतदार स्पर्धा पार पडली.या स्पर्धेत संपुर्ण महाराष्ट्रातील ११ महिलांचे संघ सहभागी झाले होते.या स्पर्धेला प्रमुख आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेत्री सुरेखा कुडची आणि येसुबाई फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांची उपस्थिती होती.या भव्य स्पर्धेचे आयोजन माजी पोलिस उपायुक्त व जनकल्याण बहुउद्देशीय फाउंडेशन पुण्याचे अध्यक्ष शहाजी पाटील, आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष व जनकल्याण बहुउद्देशीय फाउंडेशन पुण्याचे उपाध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी केले होते.या स्पर्धेचे परीक्षण लीगल ऍडवायजर महाराष्ट्र पोलीस ऍड अरूंधती शिंदे यांनी केले.
या प्रसंगी बोलताना शहाजी पाटील म्हणाले,जनकल्याण बहुउद्देशीय फाउंडेशन च्या माध्यमातून आम्ही विविध सामाजिक उपक्रम राबवत आहोत. महिलांसाठी पहिल्यांदाच एखादा उपक्रम, स्पर्धा आम्ही आयोजित केली होती. या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.संपूर्ण महाराष्ट्रातुन महिलांनी सहभाग नोंदवला.भविष्यात आमची संस्था महिलांना स्वावलंबी करण्यासाठी विविध उपक्रम राबवणार आहे, यामध्ये एकल, विधवा किंवा घटस्फोटीत महिलांना रोजगार देण्यास आमचे प्राधान्य असणार आहे.
मेघराज राजेभोसले म्हणाले, सामान्य महिलांच्या कला गुणांना संधी देण्याचा हेतूने आम्ही ‘मंगळागौरी क्वीन्स स्पर्धा २२३’ आयोजित केली होती. स्पर्धेचे पहिले वर्ष असूनही महिलांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.ह्या महिलांच्या संघाने ने सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी काळात महिला सक्षमीकरणासाठी अनेक उपक्रम राबविण्याचा आमचा मानस आहे.
दरम्यान,अभिनेत्री सुरेखा कुडची आणि अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी मंगळागौर मध्ये सहभाग घेत उपस्थितांची मनं जिंकली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा फुलकर यांनी केले.
स्पर्धेचा निकाल –
प्रथम क्रमांक-गौराई संघ,कात्रज, पुणे
द्वितीय क्रमांक- म्हाळसा संघ,जेजुरी
तृतीय क्रमांक- स्वामिनी संघ,चिंचवड
उत्तेजनार्थ- फॅशन संघ,दिघी
वेशभूषा -अंतरनाद संघ,नवी सांगवी