भीमथडी जत्रा महिला बचत गटांसाठी दिशादर्शक ठरत आहे- शरद पवार
भीमथडी जत्रेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षांपासून महिला बचत गटांच्या उत्पादनांना ब्रँडिंग व प्रमोशन यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात असल्याने अनेक महिला बचत गट सक्षम बनत आहेत.यापुढे भीमथडी सोबत महाराष्ट्र सरकारच्या वेगवेगळ्या विभागाच्या वतीने बचत गटांना विक्री व उत्पादन यासाठी मदत झाल्यास महिला सक्षमीकरणास गती मिळेल असे मत देशाचे मा.कृषिमंत्री शरदचंद्र पवार यांनी व्यक्त केले.
यावेळी त्यांनी महिला बचत गटांच्या स्टॉलला भेटी देऊन अनेक महिलांशी संवाद साधला वेगवेगळ्या उत्पादनांची माहिती घेतली.
तिसऱ्या दिवशी प्रचंड गर्दीत पवारसाहेबांनी बचत गटांच्या महिलांसह भीमथडी जत्रेला आलेल्या अनेक ग्राहकांशी मनमुक्त संवाद साधला…यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांतकुमार पाटील,डॉ.विठ्ठलशेठ मणियार,मा.सुनंदाताई पवार,पुणे जिल्हा बँक अध्यक्ष डॉ.दिगंबर दुर्गाडे, सुनील चांदेरे,संस्था मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे आदी मान्यवर उपस्थित होते

शनिवार सुट्टीच्या मुहूर्तावर भीमथडी ओसंडून वाहिली- पुणेकरांच्या खरेदीने बचत गटांचा उत्साह दुणावला.
पुणे:- ता 24 डिसेंबर 22
येथे सुरू असलेल्या भीमथडी जत्रेत काल शनिवारचा सुट्टीचा दिवस पुणेकरांनी भीमथडीसाठीच राखीव ठेवल्याचे गर्दीवरून तरी जाणवत होते. भीमथडी सिलेक्ट मधील विविध कलाकुसरीच्या हॅन्डमेड वस्तू, रंगीबेरिंगी नक्षीकाम केलेल्या व त्या त्या राज्यातील लोकप्रिय वस्तू खरेदी करताना पुणेकर दिसत आहेत.
ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीचे शारदा महिला संघ, भीमथडी फौंडेशन व महात्मा फुले कृषी विद्यपीठ राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने येथे सुरू असलेल्या भीमथडीत आजचा 4 था दिवस प्रचंड गर्दीचा ठरला. लहान मुलांची पालकांपासून चुकामुक, जेवण विभागात लागलेल्या रांगा, नंबर लावून जेवनानंतर कोल्हापुरी शाही पान, उकडीचे मोदक,उसाचा ताजा रस व अस्सल लुसलुशीत हुरडा यावर ताव मारताना पुणेकर कुटुंबीय भीमथडी जत्रेचा मनमुराद आनंद घेताना दिसत होते.

खाद्य जत्रेत पुणेकरांची प्रचंड गर्दी, जागेअभावी मोकळ्या पटांगणात मारले बस्तान
कर्जत जामखेडचे चिकन थाळी, चिकन पुलाव, चिकन रोल व चिकन समोसा, गावरान मटण, शिवपट्टण खर्डा येथील सुप्रसिद्ध बिर्याणी, शिपी आमटी, उंबर थाळी यावर पुणेकर ताव मारताना दिसत आहेत.
या शिवाय खेकडा थाळी, सुरमई, पापलेट , ओले बोंबील, कोळंबी, बांगडा, बांबू बिर्याणी व कबाब थाळी गर्दी खेचत आहेत.
खपली गव्हाची खीर
रान भाजी भाकरी , खान्देशी मांडे , थालीपीठ , मासवडी, पाटोडी, मोदक असे नवनवीन पदार्थ पुणेकर आवडीने खात आहेत.
मा. सौ. सुनंदताई पवार यांचे मार्गदर्शन, महिलांमधील वाढलेला आत्मविश्वास व महिलांचे विक्री कौशल्य या जोरावर ग्रामीण भागातील महिला बचत गटातील पदार्थ पुणेकर ग्राहकाच्या पसंतीला उतरत असल्याचे गर्दीवरून तरी लक्षात येत आहे.
दिनांक 25 डिसेंबर हा भीमथडीचा शेवटचा दिवस असून सकाळी 10.00 ते सायंकाळी 10.00 वाजेपर्यंत चालणाऱ्या भीमथडी जत्रेला पुणेकरांनी आवर्जून भेट द्यावी व या उत्सवात सहभागी व्हावेअसे आयोजकांतर्फे आवाहन करण्यात येत आहे.
