भीमथडीत गर्दी – लोककलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा पुणेकरांनी घेतला आस्वाद
भीमथडी जत्रेची लोकप्रियता, महाराष्ट्राच्या लोककलांची पर्वणी आणि सोबतीला आलेली सलग सुट्टी आशा त्रिवेणी संगमावर काल भीमथडीत पुणेकारांनी चांगली गर्दी केली. अग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीच्या वतीने येथे सुरू असलेल्या 17 व्या भिमथडी जत्रेत सांस्कृतिक कार्यक्रमाची, त्यातील लोककलांची आणि कलाकारांची पुणेकरांना भुरळ पडल्याचे दिसून आले. यवतमाळ ता. आर्णी येथील बिगाई माता आदिवासी ग्रुपच्या रमेश सीताराम झुर्वे व इतर 35 कलाकारांचे पारंपारिक आदिवासी नृत्य, सिराजभाई मणियार- शिरूर यांचा 8 कलाकारांसह बाळेश्वर सनई ताफा , भारुडाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन करणारे भारुडकार सावता केशव फुले- इंदापूर, नंदीबैल, पोतराज, सनई चौघडा, वासुदेव , जोतिषकला, गोंधळी कला, यांसह
शारदानगरच्या 64 कलाकारांच्या आपली भीमथडी डान्स ग्रुपने पुणेकरांची मने जिंकली.
भीमथडीत पर्यावरण संतुलन संदेश
प्लास्टिक वापर, त्याचे दुष्पपरिणाम, न होणारे विघटन या संदर्भात जाणीव जागृतीसाठी भीमथडीच्या माध्यमातून एक अनोखा प्रयोग या वर्षी भीमथडीत केला असून
वेस्ट प्लास्टिक पासून सेल्फी पॉईंट्स काढून पुणेकरांचे त्या कडे लक्ष वेधले आहे. विघटन न होणारे प्लास्टिक वापरून विविध सेल्फी पॉईंट्स भीमथडीत बनविले आहेत. त्यामध्ये प्लास्टिक बॉटलस पासून व्हेल फिश टेल, वेस्ट प्लायवूड पासून बटरफ्लाय, जुन्या काचा व खिडकीचे भंगार या पासून ग्लास हाऊस, लहान मुलांच्या तुटलेल्या खेळणी साहित्यापासून मिस्टर रिसायकल- एक मानवी चेहरा, तुटलेले खेळणी, घरगुती साहित्य, व दोरा यांपासून भव्य झुंबर असे 5 सेल्फी पाइंट्स तयार केले असून या ठिकाणी रांगा लावून सेल्फी काढणे चालू आहे. विशेष म्हणजे या सर्व सेल्फी पॉइंट्सची पुणेकरांनी खरेदीची इच्छाही व्यक्त केली आहे.
भीमथडीतील पॅकिंग विभाग
दरम्यान नेहमीच्या भीमथडीत पॅकिंग विभागात हॅन्ड मेड चप्पल , अगरबत्ती, पर्स , कलाकुसरीच्या वस्तू, मध ज्वेलरी, घोंगडी आदी शेकडो प्रकार विक्रीसाठी उपलब्ध आहेत. याजोडीला दिव्यांग महिलांच्या निर्माल्य ट्रस्टच्या आर्ट व क्राफ्टच्या विवध वस्तू, वेगळ्या प्रकारची विविधांगी डायरी, टेबल लॅम्प आदी वस्तुंना देखील चांगले मार्केट मिळत आहे. किन्नर बांधवांचा औषधी रोपांचा स्टॉल देखील गर्दी खेचत आहे.
भीमथडीतमध्ये स्टेजवरील कार्यक्रमत नवरदेव बी एस्सी ऍग्री- या चित्रपटाचे त्यातील सर्व कलाकारांसह टिझर लॉन्च झाले
तसेच साई पियुष या तरुण संगीतकारांचा नव्या जुन्या मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम सादर झाला. पुणेकरांनी मात्र जेवण घेताना बसकण मांडून पोटपूजा आणि गाण्यांच्या मैफिलीचा आनंद घेतला.
महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांसह शहरातील विविध शाळा महाविद्यालये, व्यवस्थापन शाखेचे विदयार्थी, मार्केटींग- ब्रँडिंग, संभाषण कला आदी बाबी शिकण्यासाठी भीमथडीत फिरतांना दिसून आले. शाकाहारी मांसाहारी पदार्थ पुणेकरांचे पसंतीस उतरत असून शेतकरी दालनातही मोठया प्रमानवर सेंद्रिय माल खरेदी करताना पुणेकर दिसत आहेत.
आज रविवार सुट्टीचा वार असल्याने पुणेकरांनी भीमथडीला भरभरून प्रतिसाद द्यावा असे आयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे