29/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

भारतीय चित्रपटात सर्वाधिक भूमिका या पुरुष कलाकारांनाच – डॉ. लक्ष्मी लिंगम

Share Post

“भारतीय चित्रपट सृष्टीत अजूनही चित्रपटामध्ये सर्वाधिक भूमिका या पुरुष कलाकारांच्या असतात. तर महिला कलाकारांना अतिशय कमी प्राधान्य दिले जाते. केवळ अभिनयच नव्हे, तर लेखन, दिग्दर्शन, तांत्रिक विभाग अशा सर्वच विभागात पुरुष कलाकारांना अधिक प्राधान्य दिले जात असल्याचे निरीक्षण टाटा इन्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेसच्या स्कूल ऑफ मिडीया अँड कल्चरल स्टडीज विभागाच्या प्रमुख प्रोफेसर डॉ. लक्ष्मी लिंगम यांनी नोंदविले आहे.पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या २१ व्या पुणे आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाअंतर्गत आयोजित मास्टर क्लासमध्ये ज्येष्ठ दिग्दर्शिका अरुणा राजे व टाटा इन्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेसच्या स्कूल ऑफ मिडीया अँड कल्चरल स्टडीज विभागाच्या प्रमुख प्रोफेसर डॉ. लक्ष्मी लिंगम यांनी ‘मेकिंग फिल्म्स अँड वॉचिंग फिल्म्स: जेंडर इन हिंदी सिनेमा’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हेलियन मॉलमधील पीव्हीआर आयकॉन या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी पुणे फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष आणि महोत्वाचे संचालक डॉ. जब्बार पटेल उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. लिंगम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चित्रपट सृष्टीत महिलांचे प्रमाण या विषयावर त्यांनी तयार केलेल्या अहवालाबाबत सादरीकरण केले.या अहवालातील प्रमुख नोंदीबाबत डॉ. लिंगम म्हणाल्या, “आपल्याकडे अजूनही चित्रपटामध्ये सर्वाधिक भूमिका या पुरुष कलाकारांच्या असतात. महिला कलाकार या केवळ नायकाच्या प्रेमिकेच्या भूमिकेत पाहायला मिळतात. महिला केंद्री चित्रपटांमध्ये देखील प्रामुख्याने मातृत्व, लैंगिकता आणि नाती हेच विषय असतात. तसेच दिग्दर्शन, लेखन या क्षेत्रातही महिला कलाकारांऐवजी पुरुष कलाकारास अधिक प्राधान्य दिले जाते. महिला कलाकारांना चित्रपट सृष्टीत काम मिळविण्यासाठी बराच संघर्ष करावा लागतो.”यावेळी महिला कलाकार म्हणून आलेल्या अनुभवाबाबत बोलता अरुणा राजे म्हणाल्या, “चित्रपट सृष्टीत एक महिला म्हणून काम करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागला. अनेकदा एखादा डायलॉग, एखादे सीन यासाठी मला भांडावे लागले. महिलांकडे कौशल्य असते, त्या चांगल्या कलाकृती घडवू शकतात यावर अनेकांना विश्वासाचं बसत नाही. महिला कलाकारांकडे देखील चांगल्या गोष्टी असू शकतात, ते देखील चांगले काम करू शकतात. अशा कलाकृती प्रत्येक व्यक्तीच्या ज्ञानात भर घालू शकतात. मात्र त्यासाठी त्यांना संधी दिली पाहिजे. त्यांना योग्य सन्मान दिला पाहिजे.”