भवानीपेठेतील पदयात्रेतधंगेकरांना मोठा प्रतिसाद
राजकीय दृष्ट्या जागरूक असणाऱ्या प्रभाग क्र.१७, भवानी पेठ मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांची बुधवार दि.१५ फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजल्यापासून भव्य पदयात्रा सुरु झाली. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मित्रपक्षांचे असंख्य कार्यकर्ते, व्यापारी व नागरिक या पदयात्रेत सहभागी झाले होते. चेतन अगरवाल घरापासून हिंदबाल समाज ते बनकर तलीम रामोशी गेट अशा मार्गाने पुढे जाणाऱ्या या पदयात्रेत तिन्ही पक्षांचे झेंडे डौलाने फडकत होते. फटाक्यांचा दणदणाट, धंगेकरांचे पोस्टर्स व धंगेकर झिंदाबाद घोषणांचा कल्लोळ यामुळे सारे वातावरण निवडणूकमय झाले होते. या पदयात्रेत उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासोबत कॉंग्रेसचे माजी राज्यमंत्री रमेश बागवे, अविनाश बागवे, अरुण गायकवाड, सुनील घाडगे, चेतन अग्रवाल, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गणेश नलावडे, हरीश लडकत, संजय गायकवाड, प्रदीप गायकवाड, शुभम शिंदे, प्रकाश फुलावरे, फईम शेख आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विशाल धनवडे, भाऊ शिंदे, निलेश राऊत, निलेश ढवळे, युवराज पारिख, राजेंद्र शिंदे, अनिल ठोंबरे, शुभम दुगाने, राजेश राऊत, योगेश खेंगरे हे प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत शेकडो नागरिकही सहभागी झाले होते. रामोशी गेट येथून पुढे भवानी माता मंदिर येथे धंगेकरांनी श्री भवानीमातेचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. तेथे काढण्यात आलेली भव्य रांगोळी सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती. मार्गात ठिकठिकाणी गणेश मंडळानी त्यांचे स्वागत केले. धंगेकरांनी गणेशाची प्रत्येक ठिकाणी आरतीही केली. दुतर्फा जमलेल्या नागरिकांमध्ये जाऊन त्यांनी संवाद साधला. अनेक नागरिक व व्यापारी आपल्या अडचणीदेखील सांगत होते. जागोजागी पाणी, सरबत, चहा दिले जात होते. पुढे दादापीर दर्गा सरळ मार्गे भारत टॉकीज समोर एडी कॅम्प चौक येथे ही पदयात्रा संपली. महाविकास आघाडीच्या झिंदाबादच्या घोषणांनी सारा परिसर दणाणून गेल्यानंतर या पदयात्रेचा समारोप करण्यात आला.