“ब्ल्यू ब्रिगेड अल्ट्रा 338K” उपक्रमातून उभारला 2 लाखांचा मदतनिधी
टाईप 1 डायबेटीस असणाऱ्या वंचित घटकातील लहान मुलांसाठी मदतनिधी उभा करण्यासाठी आयोजित केलेल्या “ब्ल्यू ब्रिगेड अल्ट्रा 338K” या सामाजिक उपक्रमात ब्ल्यू ब्रिगेड रनिंग क्लबचे अजय देसाई, प्रशांत पेठे आणि श्यामल मोंडल यांनी 338 किलोमीटरचे अंतर सलग 71 तास 15 मिनिटात धावत कापून एक नवा विक्रम रचला आहे. ब्ल्यू ब्रिगेडचे धावपटू 3 दिवस आणि 3 रात्री अवघ्या 10 मिनिटांच्या पॉवर नॅप्ससह आणि जेवणासाठीची काही वेळाची विश्रांती वगळता अहोरात्र धावले. ब्ल्यू ब्रिगेडचे संस्थापक अजय देसाई, मर्चंट नेव्ही ऑफिसर आणि सिनेमा निर्माते प्रशांत पेठे, ट्रेकर आणि फिटनेस कोच श्यामल मोंडल यांनी हा आव्हानात्मक उपक्रम पूर्ण केला. त्यांच्यासोबत ब्ल्यू ब्रिगेडमधील युसूफ देवसवाला यांनी 161 किलोमीटर अंतर धावून पूर्ण केले.मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांचा सामना करत असलेल्या अजय देसाई यांनी फक्त धावण्यातून आपल्या आजारांवर नियंत्रण मिळवले. याचा अनुभव आणि ज्ञान इतरांनाही देता यावे यासाठी त्यांनी २०१५ साली ‘ब्ल्यू ब्रिगेड रनिंग क्लब’ची स्थापना केली. १० लोकांपासून सुरू झालेली ही सामाजिक संस्था आता तब्बल ६०० लोकांपर्यंत पोहोचली आहे, तसेच पुण्यातील ८ वेगवेगळ्या स्थळांवर कार्यरत आहे. ब्ल्यू ब्रिगेडच्या सदस्यांनी याआधीही अश्या प्रकारचे दीर्घ पल्ला धावण्याचे उपक्रम पूर्ण केले आहेत आणि नित्याशा फाउंडेशन सारख्या संस्थेसाठी निधी उभारला आहे. ही संस्था वंचित घटकातील लहान मुलांसोबत टाइप 1 मधुमेहाचे उपचार करण्यासाठी काम करते. 338 किलोमीटर धावण्याचा हा उपक्रम नित्याशासाठी निधी गोळा करण्यासाठी होता आणि त्यांनी ह्या माध्यमातून 2 लाख रुपयांची देणगी जमा केली. त्याबद्दल त्यांचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे . लोणी येथील शिक्षा एज्युकेशन सोसायटीच्या इनोव्हेरा शाळेपासून रामदरा मंदिरापर्यंतचा २५ किमीच्या रस्त्यावर धावून हा उपक्रम पूर्ण केला गेला. तसेच ‘ब्ल्यू ब्रिगेड रनिंग क्लब’चे युसूफ देवसवाला १६१ किमी धावले. ह्या मार्गावर धावताना धावपटूंसमोर अनेक आव्हाने होती. ८५% चढ, खराब रस्ते, कधी १०°तर कधी ३८°तापमान आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ५ जणात मिळून १८० लिटर पाणी पिऊन ही धाव पूर्ण करताना तब्बल 25 हजारांहून जास्त कॅलरीज बर्न झाल्या. 161 किलोमीटर धावण्याचा मानस असणाऱ्या सतेज कल्याणीला तब्येतीच्या कारणांमुळे 60 किलोमीटर धावून थांबावे लागले. खराब रस्ते, खड्डे, पायवाटा यांचा धावण्याच्या वेगात अडथळा येत होता. बहुतांशवेळा रात्री घनदाट काळोखात धावावे लागले. तरीही या परिस्थितीला न जुमानता ब्ल्यू ब्रिगेडियर्सनी आपला पल्ला गाठलाच. एका संस्थेच्या मदतीकरता ब्लू-ब्रिगेडने घेतलेली मेहनत खरंच कौतुकास्पद आहे. मानवतेचे दर्शन घडवणाऱ्या त्यांच्या या उपक्रमामुळे अनेकांना प्रेरणा मिळत आहे.


