‘ब्रिलिओच्या”नॅशनल स्टेम चॅलेंज’मध्ये वर्षभरात वीस राज्यांतील २,५००हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग
ब्रिलिओ या माहिती तंत्रज्ञान कंपनीने आयोजित केलेल्या नॅशनल स्टेम चॅलेंजच्या तिसऱ्या आवृत्तीच्या विजेत्यांची घोषणा आज पुण्यात करण्यात आली. ब्रिलिओ ही एक डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन क्षेत्रातील सेवा व सोल्यूशन्स पुरविणारी संस्था असून तिने स्टेम लर्निंग या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने हे चॅलेंज आयोजित केले होते. शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्टेमविषयक शिक्षण रुजविण्याचे काम ‘स्टेम लर्निंग’ करते.
विज्ञान आणि गणिताच्या मॉडेल स्पर्धा, तंत्रज्ञानविषयक प्रश्नमंजुषा आणि अभियांत्रिकीमधील प्रयोग असे उपक्रम या स्टेम (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित) संबंधित स्पर्धेच्या अनुषंगाने गेले वर्षभर घेण्यात आले होते. त्यांचा अंतिम समारोप आज झाला. या महाअंतिम फेरीत १३ राज्यांच्या २० शाळांमधील १३० विद्यार्थी आणि ४० शिक्षक उपस्थित होते.
कौशल्य विकासावर भर असणारी ‘ब्रिलिओ नॅशनल स्टेम चॅलेंज’ ही एक अनोखी राष्ट्रीय स्पर्धा आहे. भारतभरातील सरकारी आणि अनुदानित शाळांमधील पात्र, वंचित विद्यार्थ्यांना ‘स्टेम’ शिक्षणाचा एक अद्वितीय स्वरुपाचा मंच या स्पर्धेमधून उपलब्ध होतो. इयत्ता सहावी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल, नावीन्य आणि डिझाइन थिंकिंगचे कौशल्य या गोष्टी वाढवण्याच्या दृष्टीने ‘नॅशनल स्टेम चॅलेंज’ रचण्यात आलेले असते.
स्पर्धेच्या उपांत्य फेरीत २० राज्यांतील २,५०० हून अधिक विद्यार्थ्यांना ब्रिलिओ आणि ‘स्टेम लर्निंग’च्या स्वयंसेवकांद्वारे नवीन-युगातील तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात आले. या विद्यार्थ्यांनी ७०हून अधिक विभागीय व राज्यस्तरीय फेऱ्यांमध्ये भाग घेतला. महाराष्ट्र, कर्नाटक, झारखंड, आसाम, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरयाणा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, मध्यप्रदेश, तेलंगणा, राजस्थान आणि तामिळनाडू या १३ राज्यांतील विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या अव्वल ५० संघांनी राष्ट्रीय अंतिम फेरीत स्थान मिळविले.