‘ब्राह्मण रत्ने’ या १२०० पानांच्या चरित्रकोश ग्रंथाचे प्रकाशन रविवारी (दि.२९)
आम्ही सारे ब्राह्मण आणि ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका तर्फे गेल्या सुमारे २२५ वर्षांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये उत्तुंग कामगिरी करणा-या कर्तृत्त्ववान अशा ७०० हून अधिक राष्ट्रकायार्साठी समर्पित ब्राह्मण व्यक्तिमत्वांचा समावेश असलेला ‘ब्राह्मण रत्ने’ हा चरित्रकोश ग्रंथ साकारण्यात आला आहे. रविवार, दिनांक २९ आॅक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिरात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या ग्रंथांचे प्रकाशन होणार आहे, अशी माहिती ग्रंथाच्या संपादक मंडळाचे सदस्य असलेले ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर, ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, प्रकल्प संचालक गोविंद हर्डीकर, संजय ओर्पे व ग्रंथाचे संपादक भालचंद्र कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्रकाशन सोहळ्यास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, माजी खासदार प्रकाश जावडेकर, माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, संपादक मंडळातील सदस्य माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी आणि विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. सुमारे १२०० पानांचा हा ग्रंथ तयार झाला असून ७०० हून अधिक महनीय ब्राह्मण व्यक्तींचा यात समावेश केलेला आहे. ज्यांची स्मृती या ग्रंथरुपाने कायम जतन करून ठेवली जाईल.
चरित्रकोश ग्रंथाच्या संपादक मंडळात एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), पं. वसंतराव गाडगीळ, पंचांगकर्ते मोहन दाते, ग्राहक पेठेचे सूर्यकांत पाठक, ज्येष्ठ समुपदेशक डॉ. श्रीराम गीत, ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ, ज्येष्ठ विचारवंत अनिल नेने, ज्येष्ठ उद्योजक सुधीर राशिंगकर, हर्षवर्धन भावे, अनिल गानू, बँकिंगतज्ञ डॉ. मुकुंद अभ्यंकर, प्रवचनकार सुहास कुलकर्णी, ज्येष्ठ व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे, सिरमचे संचालक केदार गोखले यांचा समावेश आहे.