17/07/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

बिग एफएम वर ‘बिग मराठी बायोस्कोप विथ सुबोध भावे ‘ सीझन २ सुरु

Share Post

बिग एफएम हा आपला अत्यंंत गाजलेल्या ‘बिग मराठी बायोस्कोप विथ सुबोध भावे’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या आवृत्तीसह परत येत आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत अष्टपैलू अभिनेता सुबोध भावे यांनी प्रेक्षकांना कालातीत क्षणांनी गुंफलेला कालातीत प्रवास घडविण्याचे वचन दिले. नुकताच प्रीमियर झालेला हा कार्यक्रम पुण्यात सोमवार ते शनिवारी सायंकाळी ७ ते ८ आणि पुणे व मुंबई या दोन्ही ठिकाणी रविवारी सकाळी ७ ते १० पर्यंत ऐकता येईल.

मराठी चित्रपटसृष्टीची जादू उलगडून दाखविणाऱ्या या शोचा पहिला सीझन जबरदस्त यशस्वी ठरला आणि त्याने श्रोत्यांच्या मनावर भुरळ पाडली. अस्सल संशोधनावर आधारित या दुसऱ्या सीझनमध्ये श्रोत्यांना एक विशिष्ट अनुभव देणारा एक अद्वितीय घटक असणार आहे. आपल्या असामान्य कामासाठी मराठी इंडस्ट्रीमध्ये ओळख निर्माण केलेले प्रभावी अभिनेता, लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक सुबोध भावे केवळ मराठी चित्रपटांच्या अज्ञात कथा केवळ सांगणारच नाही तर या कथांबद्दलची आपली मतेही मांडतील.

दुुसऱ्या सीझनमध्ये एका आकर्षक साप्ताहिक स्पर्धेसोबतच एक इंटरअॅक्टिव्ह ट्विस्टदेखील असणार आहे. यात सुबोध भावे दर सोमवारी श्रोत्यांना एका प्रश्नासोबत आणि त्यानंतर अज्ञात किस्सा सांगून श्रोत्यांपुढे आव्हान निर्माण करतो. उत्साहाची अतिरिक्त भर घालत या शोमध्ये ‘फ्रॉम हार्सस् माऊथ: किती खरे किती खोटे’ हा एक मनोरंजक भाग सादर करतो जो मराठी चित्रपटसृष्टीतील घटनांमागील सत्य उलगडून दाखवतो. सेलिब्रिटींचे वाढदिवस आणि मराठी चित्रपटातील महत्त्वाचे टप्पे यांना समर्पित विशेष विभाग शोला एक आनंददायी स्पर्श देतात, जे सेलिब्रेशन आणि नॉस्टॅल्जिया यांचे मिश्रण आहे.

बिग एफएमचे सीओओ सुनील कुमारन म्हणाले, हा शो म्हणजे मराठी सिनेमा आणि नाटकांचा अथ पासून इति पर्यंतचा प्रवास दर्शवणारा शो आहे जो माहितीपूर्ण तर आहेच शिवाय आमच्या श्रोत्यांचे मनोरंजन ही करेल. सुबोध भावेची असामान्य प्रतिभा आणि मराठी प्रेक्षकांशी असलेला गहिरा संबंध यामुळे या कार्यक्रमाला एक अतुलनीय आकर्षण मिळते. दुसऱ्या सीझनद्वारे आमच्या श्रोत्यांना मनोरंजनासोबतच नॉस्टॅल्जियाची भावना निर्माण अशी अधिक आकर्षक सामग्री सादर करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.

अभिनेता आणि होस्ट सुबोध भावे म्हणाले, बिग मराठी बायोस्कोपमुळे मला रेडिओ होस्टची भूमिका स्वीकारण्याची अनोखी संधी मिळाली.या शोमुळे मला माझ्या श्रोत्यांशी अधिक वैयक्तिक पातळीवर कनेक्ट होण्यास मदत झाली आहे. हा सीझन आमच्या प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी रोमांचक नवीन घटक, आकर्षक सामग्री आणि भरपूर आश्चर्यांनी भरलेला आहे. श्रोत्यांशी संवाद साधणे ही माझ्यासाठी नेहमीच आनंदाची गोष्ट असते आणि श्रोत्यांना खूप आनंद मिळेल, याची मी वाट पाहत आहे.

या कार्यक्रमाचे सादरकर्ता भागीदार हे पीएनजी ज्वेलर्स असून वित्त भागीदार लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लिमिटेड हे आहेत. पुणे आणि मुंबई सोबतच अहमदनगर, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर आणि नागपूर यांसारख्या अनेक शहरांमध्ये सोमवार ते शनिवार, संध्याकाळी ७ ते ८ या वेळेत या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण होईल. रविवारी सकाळी ७ ते १० या दरम्यान गोवा, इंदोर आणि नागपूर येथे आणि सकाळी ८ ते ११ या वेळेत अहमदनगर, औरंगाबाद, सोलापूर आणि कोल्हापूर येथे त्याचे प्रसारण होईल.