‘बाईपण भारी देवा’नंतर संगीतकार साई-पियुषला संगीतात करायचेत ‘हे’ नवे एक्सपरिमेंट
सध्या केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचा डंका जगभर वाजतोय. या चित्रपटातील कथानकानं सगळ्यांना भारावून टाकलंच आहे पण त्यापेक्षा अधिक या चित्रपटाच्या संगीतानं जगातील कानाकोपऱ्यात विसावलेल्या प्रत्येक मराठी माणासाला आपल्या तालावर ठेका धरायला भाग पाडलं. ‘बाईपण भारी देवा’ या टायटल सॉंगवर तर रील्सचा नुसता खच पडला. आणि याचं क्रेडिट जातं ते या चित्रपटाचे संगीतकार साई-पियुष यांना. मराठी संगीत विश्वाला साई-पियुषच्या निमित्तानं एक उत्तम संगीतकारांची जोडी मिळाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
पहिल्या भेटीतच साई-पियुषनं ठरवली होती आपली म्युझिक जर्नी..
साई आणि पियुष यांनी रितसर संगीताचं शिक्षण घेतलेलं नसलं तरी त्यांना संगीताचं बाळकडू त्यांच्या घरातनं मिळालं होतं. साईच्या घरात त्याचे बाबा कांचन निंबाळकर उत्तम गिटार वाजवतात तर पियुषच्या घरात त्याच्या वडीलांच्या आजीपासून गाण्याचे संस्कार होत आलेले. भजन-किर्तनाच्या सुरावटीत पियुष लहानाचा मोठा झाला. लहानपणापासून दोघांचा वेगवेगळ्या कारणानं संगीताशी संबंध आला अन् पुण्यातील अनेक संगीत क्षेत्राशी संबंधित स्पर्धांमध्ये हे दोघे भाग घेऊ लागले. आणि तिथेच एका स्पर्धेनिमित्तानं साई-पियुषची भेट घडली अन् दोघांनी संगीताप्रती असलेली आपली आवड एकत्रितपणे पुढे घेऊन जायचं ठरवलं. आणि असा सुरु झाला ‘बाईपण भारी देवा’च्या या हरहुन्नरी संगीतकारांचा संगीतक्षेत्राचा प्रवास.
काम बोललं अन् यश मिळालं…
‘बाईपण भारी देवा’च्या सध्या गाजत असलेल्या सगळ्या गाण्यांना साई-पियुषनं आजच्या ट्रेन्डनुसार साज चढवताना कुठेही ट्रेडिशनल सूर हरवू दिलेला नाही हे स्पष्ट जाणवतं. तसं पहायला गेलं तर साई-पियुष ही जोडी मराठी इंडस्ट्रीत २००८ पासून कार्यरत आहे. २०१० पासून त्यांनी व्यावसायिक कामाला सुरुवात केली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
‘मिशन पॉसिबल’,’रणभूमी’,’ती अॅन्ड ती’, ‘आरॉन’, ‘अग बाई अरेच्चा २’, ‘ ख्वाडा’, ‘लग्न मुबारक’, ‘बाईपण भारी देवा’ सारख्या चित्रपटांना तर,
‘दामोदर पंत’, ‘गेला उडत’, ‘ढॅण्टॅ ढॅण्ड’, ‘डोन्ट वरी बी हॅप्पी’, ‘के दिल अभी भरा नाही’ सारखी प्रसिद्ध नाटकं तर ‘बन मस्का’, ‘लव्ह लग्न लोचा’ सारख्या काही प्रसिद्ध मालिकां सोबत काही हिंदी डेलीसोप अशा कलाकृतींना साई-पियुषनं आतापर्यंत संगीत दिलं आहे.
इतकंच नाही तर मराठीतील पहिली बिग बजेट वेब सीरिज ‘गोंद्या आला रे’ ला संगीत देऊन साई-पियुषने नवं तंज्ञत्रान असलेल्या डिजिटल माध्यमावरही आपली पकड घट्ट रोवली आहे. ‘कोण प्रविण तांबे?’ सारख्या हिंदी सिनेमाला देखील या जोडगोळीनं संगीत दिलं आहे. आपलं काम बोलत राहिलं,आलेल्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न केला आणि काम येत गेलं..असं साई-पियुषच्या बाबतील घडत गेलं.
मेलडीमध्ये एक्परिमेंट करायला आवडतील पण..
‘बाईपण भारी देवा’च्या संगीताचे लाखो चाहते निर्माण करणाऱ्या साई-पियुष या संगीतकार जोडीला आता मेलडीमध्ये प्रयोग करायचे आहेत. पण असं करताना त्यांना सध्याच्या ट्रेन्डसनुसारही आपल्या संगीतात बदल आणायचे आहेत. संगीत वर्षागणिक बदलतं,त्यात नवनवीन गोष्टी येतात त्यामुळे आम्ही जे गेल्यावर्षी केलं आहे ते या वर्षी लोकांना आवडेलच अशी हमी देता यायची नाही म्हणून सध्याच्या ट्रेन्डची आमच्या संगीतावर छाप दिसेल असं संगीतकार साई-पियुषचं म्हणणं आहे.