बहुचर्चित जँगो जेडी २६ मे रोजी होणार प्रदर्शित!
फिल्म मिल प्रायव्हेट लिमिटेड प्रॉडक्शन्स बॅनर अंतर्गत, रोहित भागवत, हरदीप सचदेव निर्मित हरदीप सचदेव दिग्दर्शित बहुचर्चित जाँगो जेडी हा मराठी चित्रपट येत्या २६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मुंबईत करिअर घडवण्यासाठी आलेल्या तरुणाचा संघर्ष या सिनेमात पहायला मिळणार आहे.
दिग्दर्शक हरदीप सचदेव सांगतात की, हा माझा दिग्दर्शनातला पहिलाच सिनेमा आहे, मी पंजाबी असलो तरी अनेक वर्षांपासून मुंबईत राहत असल्याने सर्व मित्र परिवार मराठी आहे, त्यामुळे माझे मराठी भाषेवर आणि सिनेमावर खूप प्रेम आहे आणि म्हणूनच मी माझा मित्र निर्माता रोहित भागवत याच्या सोबत हा मराठी चित्रपट करायला घेतला.
छोट्या शहरातून आलेल्या युवकाची संघर्ष गाथा यात बघायला मिळेल, तो युवक म्हणजेच सर्वसामान्यांच्या आतला नायक आहे.
नायकाची भूमिका अभिनव सावंत याने साकारली आहे. प्रथमतच तो मध्यवर्ती भूमिका साकारतो आहे. अभिनव सांगतो की हा चित्रपट माझ्या आयुष्यातील सगळयात स्पेशल गोष्ट आहे. करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात एवढी सुंदर आणि मध्यवर्ती भूमिका मिळायला भाग्य लागते, आणि मी खरंच निर्माते आणि दिग्दर्शक यांचे मनापासून आभार मानतो त्यांनी मला ही संधी दिली.
जँगो जेडी या सिनेमाची सगळयात आकर्षणाची बाजू म्हणजे सिनेमाची नायिका गौरी नलावडे. या सिनेमातला तिचा सहज आणि सुंदर वावर सिनेमाला वेगळीच रंगत आणतो. तिच्या येण्याने सिनेमाला गुलाबी रंग लाभला आहे. विशेष बाब म्हणजे या सिनेमात तिने प्रथमतच एक गाणं आपल्या आवाजात गायलं आहे. फिकर जरा दूर.. असे गा गाण्याचे बोल आहे. याबद्दल गौरी सांगते की, मी सेटवर अनेकदा गाणी गुणगुणत असायचे हे दिग्दर्शकाने पाहिले आणि एक दिवस मला सहजच विचारले की तुझा आवाज खरंच खूप छान आहे, तू आपल्या सिनेमात गाणं गाशील काय? मी बोलले की आजवर कधी गायले नाहीये पण आपण प्रयत्न करूया असं म्हणत सुरुवात केली आणि ते माझ्या आवाजातले गाणे तुम्हाला सिनेमात बघायला मिळेल.
कथा आणि पटकथा हरदीप सचदेव आणि रोहित भागवत यांनी लिहली आहे.चित्रपटात गौरी नलावडे, अभिनव सावंत सोबत आदित्य आंब्रे, योगेश सोमण, डॉ. निखिल राजेशिर्के, वरुण पनवार इ. कलाकारांच्या देखील महत्वपूर्ण भूमिका आहेत. चित्रपटात एकूण चार गाणी आहेत. या यापूर्वी हरदीप सचदेव यांनी लगान, दिल चाहता है हिंदी चित्रपटांमध्ये परिणामकारक योगदान दिले आहे. त्यामुळे या चित्रपटाकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत.