23/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

बकासुर आणि सुंदर या स्टार बैलजोडीने केला ‘नवरदेव’चा पोस्टर लॉन्च

Share Post

तमाम तरूणाईच्या अगदी मनाजवळचा विषय म्हणजे लग्न! सध्या सगळीकडे भरपूर लग्नाळू नवरदेव दिसतात मात्र त्यांना नवरी मिळत नाही. गावातील शेतकरी मुलांची परिस्थिती तर अजून बिकट आहे. हाच विषय मोठया पडद्यावर घेऊन येत आहेत दिग्दर्शक राम खाटमोडे! शेतकरी लग्नाळू तरूणांची कथा सांगणाऱ्या ‘नवरदेव B Sc. Agri.’ या चित्रपटाचं पहिलं पोस्टर आज प्रकाशित करण्यात आलं. या चित्रपटाचा पोस्टर लॉन्च खूप आगळा-वेगळा होता, कारण बकासुर आणि सुंदर या बैलजोडीने हिरवा झेंडा दाखवत या चित्रपटाचे पोस्टर लॉन्च केले. या चित्रपटात अभिनेता क्षितीश दाते नवरदेवाच्या भूमिकेत झळकणार आहे. पुण्यातील आर्यन्स वर्ल्ड स्कूलमध्ये हा पोस्टर लॉन्च सोहळा थाटामाटात संपन्न झाला.

सध्या समाजात लग्नासाठी मुली मिळणं कठीण झालंय, असं आपण अनेकांच्या तोंडून ऐकतो… त्यातही शेतकरी तरूण असेल तर विचारायलाच नको… पण शेतीचं उत्तम शिक्षण घेतलेल्या महत्त्वाकांक्षी तरूणालाही लग्नासाठी कोणकोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतं याची कथा या चित्रपटातून आपल्याला बघायला मिळणार आहे. क्षितीश दाते, प्रियदर्शिनी इंदलकर, मकरंद अनासपुरे, गार्गी फुले, रमेश परदेशी, हार्दिक जोशी, नेहा शितोळे, संदीप पाठक अशा उत्तम कलाकारांची मांदियाळी या चित्रपटात आपल्याला दिसेल. आज प्रकाशित झालेल्या पोस्टरमध्ये क्षितीश मुंडावळ्या बांधून नवरीच्या प्रतिक्षेत असलेला दिसतोय… त्याला नवरी मिळणार की नाही याचं उत्तर आपल्याला २६ जानेवारीला चित्रपटगृहातच मिळेल.