प्लोगेथाॅनमधून ‘एमआयटी एडीटी’चा राष्ट्रीय युवा दिन
एमआयटी आर्ट, डिझाइन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, पुणेचे विद्यार्थी कल्याण मंडळ, स्वीडिश इन्स्टिट्यूट व अॅल्युमनी नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने तिर्थक्षेत्र रामदरा मंदिर परिसरात प्लोगेथाॅनचे आयोजन करून स्वच्छता व आरोग्याचा संदेश देताना राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला. धनकचऱ्यामुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास व व्यायामाच्या अभावामुळे मनुष्याचा आयुष्यात वाढलेले आजार यांच्याप्रती समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या प्लोगेथाॅनमध्ये विद्यापीठाचे शेकडो विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. रामदरा मंदिरात सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास देवाचे दर्शन घेऊन या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. या उक्रमात केवळ मंदिर परिसराची साफसफाई करण्यात आली नाही तर विद्यार्थ्यांनी फलकांद्वारे लोकांची जनजागृती करताना त्यांचे प्रबोधन देखील केले. यावेळी विद्यार्थी कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक डाॅ.सुराज भोयर, बांबू इंडिया मिशनचे उद्योजक योगेश शिंदे, तेनझिंग नाॅरगे अँडव्हेंचर पुरस्कार विजेती रितू केडिया, स्वीडन अॅल्युमनीचे प्रा.तेजस कराड, डो सेव्ह फाऊंडेशनच्या निर्मला थोरमोटे, अनिकेत थोरमोटे आणि ग्रीन फाऊंडेशनचे अमित जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना योगेश शिंदे यांनी प्लॅस्टिकच्या वस्तूंऐवजी बांबूच्या वस्तूंचा वापर वाढवणे किती आवश्यक आहे हे विद्यार्थ्यांना पटवून दिले. तसेच त्यांनी यावेळी एमआयटी एडीटी व प्रा.डाॅ.मंगेश कराड यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या प्लोगेथाॅन सारख्या उपक्रमांचे कौतुक देखील केले.
तसेच रितू केडिया यांनी यावेळी यश मिळवण्यासाठी उत्कटता, संयम आणि चिकाटीचे महत्त्व सांगितले. विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्यास प्रवृत्त करण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांशी आपले साहसी अनुभव विशद केले.