प्रेम जितकं जुनं होत जातं, तितकं मुरत जातं… ‘आठवणी’चे पोस्टर रिलीज
कौटुंबिक आणि भावनिक चित्रपटांना मराठी प्रेक्षक नेहमीच भरभरून प्रेम देत आले आहेत. यामुळेच दिग्दर्शक सिद्धांत सावंत आपल्यासमोर असाच एक खास चित्रपट घेऊन सज्ज आहेत. ‘आठवणी’ असे या चित्रपटाचे नाव असून आज (ता. १३) त्याचे पोस्टर रिलीज झाले. या पोस्टरवरून असं लक्षात येतंय की, मराठी प्रेक्षकांसाठी अनेक दिवसांनंतर असा भावनिक आणि नात्यांची गोष्ट सांगणारा चित्रपट येत आहे.
सिद्धांत सावंत यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिलाच चित्रपट असून पोस्टरवरून त्याची प्रगल्भता लक्षात येते. ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी या पोस्टरवर झळकत आहेत, तर त्यांच्यासोबत सुहृद वार्डेकर आणि वैष्णवी करमरकर दिसत आहेत. याशिवाय अभिनेता निनाद सावंत या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असेल. नात्यांची गुंतागुंत, एकमेकांवर असलेलं निर्व्याज प्रेम आणि आपल्या जोडीदाराप्रती असलेली ओढ या पोस्टरमधून दिसून येते. त्यामुळे हा चित्रपटाचे कथानक नक्की काय असेल हे बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
मिनाश प्रॉडक्शन प्रस्तुत आणि सिद्धांत सावंत व अशोक सावंत निर्मित ‘आठवणी’ हा चित्रपट ७ जुलैला महाराष्ट्रभरात प्रदर्शित होईल.